नाशिक | शैलेंद्र तनपुरे- दै.’देशदूत’ – सल्लागार संपादक
भारतात स्री-पुरुष संबंधासाठीचे वय १८ असावे की १६ याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या ‘न्यायालय मित्र’ ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी हे वय १६ करण्याची शिफारस केल्यानंतर त्यासंदर्भात मतमतांतरे सुरू आहेत. असाच दुसरा एक प्रकार म्हणजे बाल गुन्हेगाराच्या वयासंदर्भाचा! हा मुद्दाही सतत चर्चिला जातो. सध्या सर्वत्रच ज्या पद्धतीने बालगुन्हेगारांची संख्या वाढत चालली आहे, ती पाहता विशेषत:पोलीस अधिकार्यांनी यात कालानुरूप सुधारणा करण्याबाबतची आपली आग्रही भूमिका मांडली आहे. हे सारे आठवायचे कारण म्हणजे, सातपूर येथील घटना!
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मारामारीत एका विद्यार्थ्याला नुकताच हकनाक जीव गमवावा लागला. बसण्याचा बाक पुढे-मागे करण्याच्या किरकोळ कारणावरून या मुलांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसान दोघांनी संबंधित मुलाला एवढे मारले की त्यात त्याचा जीव जाण्यात झाले. या दोघांना आता खुनाच्या गुन्ह्याखाली ताब्यात घेण्यात आले आहे. एक जीवानिशी गेला आणि त्याला मारणार्यांवर आता गुन्हेगारीचा शिक्का बसला. साहजिकच किशोर सुधारगृहातील संगत पुढे त्यांना काय शिकवते यावर त्यांचेही आयुष्य ठरणार! कायद्यानुसार दोघेही अल्पवयीन असल्याने त्यांना गुन्हेगार न मानता विधिसंघर्षित समजले जाईल. अशा विधिसंघर्षित बालकांवर कठोर कारवाई होत नाही. त्यांच्या वयामुळे त्यांना कायद्यानेच संरक्षण दिलेले असल्याने किशोर सुधारगृहात त्यांची रवानगी केली जाते. वय हेच त्यांचे सर्वात मोठे कवच बनते.
कायद्यातील ही पळवाट सध्या अनेक नामचीन गुन्हेगारांसाठी मोठीच उपलब्धी ठरली असून वंचित समाजातील लहान मुलांचा अवैध कामांसाठी त्यांनी वापर करणे चालू केले आहे. गेल्या काही दिवसांत नाशिक पोलीस आयुक्तालयातील खून, हाणामारी, चोर्या यासारख्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग पुढे आला आहे. विधिसंघर्षित बालकांसाठी गंभीर शिक्षेची तरतूद नसल्याने सराईत गुन्हेगार अशा बालकांचा पद्धतशीर वापर करताना आढळून येत आहेत. साहजिकच अशा घटनांना आळा घालायचा तरी कसा? ही पोलिसांची मोठीच डोकेदुखी बनली आहे. गेल्या सहा महिन्यांत आयुक्तालय हद्दीत ३१ खून झाले. यातील १० संशयित हे अल्पवयीन आहेत. मारहाणीच्या गुन्ह्यात तर १२ ते १६ वयोगटातील तब्बल २९ जण अल्पवयीन आहेत. चोरी-दरोड्यासारख्या गुन्ह्यांतही याच वयोगटातील ३४ बालके आहेत. गेल्या सहा महिन्यांत विविध गुन्ह्यांमध्ये तब्बल १४६ विधिसंघर्षित बालके आढळून आले आहेत. हीच संख्या २०२३ ला २०२ तर २०२४ ला २२१ अशी वाढती आहे.
यंदा जूनअखेरपर्यंतच हा आकडा १४६ पर्यंत पोहोचला आहे. तो पुढील सहा महिन्यांत किती वाढू शकेल याचा अंदाज सातपूरच्या घटनेतून येऊ शकतो. या गुन्हेगारांमध्ये बारा वर्षांखालील मुलेही सहभागी झाल्याचे दिसत असून सर्वाधिक बालगुन्हेगार हे १६ ते १८ वयोगटातील आहेत. ही अत्यंत चिंताजनक अशी स्थिती आहे. समाजातील सर्वांनीच या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून तातडीने काहीतरी हालचाल करावी अशी वेळ आली आहे. सातपूरमधील घटना ही, याकडे तत्काळ लक्ष द्यावे अशा आशयाचा इशारा समजायला हवा. रिमांड होम म्हणजेच किशोर सुधारगृहात या बालकांना ठेवले जात असले तरी त्यांच्यात सुधारणा होण्याचे प्रसंग तुलनेने कमी असल्याचेही आढळून येते. अशा विधिसंघर्षित बालकांचे समुपदेशन वेळोवेळी केले जाते. तथापि, त्याचाही फारसा अनुकूल परिणाम होताना दिसत नाही. सेवाभावी संस्थांकडून मुलांना दत्तक घेण्याचाही प्रयत्न होतो; परंतु ही मुले शिक्षण अर्धवट सोडून पुन्हा गुन्हेगारीकडे वळल्याचे अनुभव आहेत. कष्ट करून मौज करता येऊ शकत नाही, याची जाण अशा मुलांना बालवयातच येते आणि मग झटपट पैसे मिळवण्यासाठी ते वाममार्गाला लागतात.
गोरगरीब, वंचित समाजातील मुलांचा सहभाग तुलनेने अधिक आढळत असला तरी अलीकडे उच्चभ्रू समाजातील मुलेही छानछोकीच्या नादात गुन्हेगारीत सापडल्याची उदाहरणे आहेत. खुटवडनगर या कामगारबहुल भागात काही महिन्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलाचा भरदिवसा खून झाला. त्याचे रिल्सही समाज माध्यमांवर टाकण्याचे औद्धत्य गुन्हेगारांनी दाखवले. मारणारेही अल्पवयीन आणि जो मरण पावला त्यानेही तत्पूर्वी एका सराईताचा खून केल्याचे आढळून आले. गुन्ह्यातून गुन्ह्याकडे असा हा प्रवास एकूणच समाजाच्या अध:पतनाचा निर्देशांक बनत चालला आहे. समाज माध्यमाचा अतिरेक, मोबाईल फोनची सवय, पालक वा ज्येष्ठांशी हरवलेला संवाद आणि सामाजिक धाक नसणे अशी काही कारणे या वाढत्या बालगुन्हेगारीची देता येतील. तरीही पालकांच्या यासंदर्भातील जबाबदारीकडे डोळेझाक करता येणार नाही. आपला पाल्य कोणाबरोबर असतो, दिवसभर काय करतो, मोबाईलमध्ये नेमके काय पाहतो याकडे लक्ष द्यायला हवे.
मोबाईल क्रांतीमुळे उघडेनागडे सारे जग या वयात येऊ पाहणार्या मुलांच्या हातात सामावले आहे. त्याच्या दृश्य-अदृश्य परिणामांचा हा परिपाक आहे. हल्ली शाळांमध्येही फुटकळ कारणांनीही लहानग्यांमध्ये मारामार्या होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. आपल्या पाल्याची सामाजिक जाणीव प्रगल्भ करण्यासाठी पालकांनी अधिक गांभीर्याने प्रयत्न करायला हवेत. शिस्तीचा अतिरेक न करताही काही नैतिक धाक कौटुंबिक संस्कारातून रुजवता येऊ शकतो. दुर्दैवाने अनेक पालकांना मुलांच्या वाढत्या वयात त्यांच्याशी संवाद साधण्याऐवजी कोणत्या तरी लासेसमध्ये त्यांना अडकवण्यात धन्यता वाटते. मुलांच्या भविष्यासाठी केली जाणारी ही तजवीज हल्ली उलटत असल्याने आपापल्या पाल्यांना आपुलकी, सामंजस्य अन् जबाबदारीची उब देण्यात खरे भविष्य दडले आहे, हे समजेल तो सुदिन.




