नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै.’देशदूत’ – सल्लागार संपादक
बरोबर तीस वर्षांपूर्वी म्हणजेच १९९५-९६ च्या दरम्यान तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांनी नाशिक-पुणे या बहुप्रतीक्षित रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. तेव्हा त्यांनी नाशिकरोड रेल्वे स्थानकाची पाहणीही केली होती. आज तीस वर्षांनंतर परिस्थिती काय दिसते? तर या मार्गाचा प्रकल्प अहवाल दोन-तीन वेळा तयार होऊन आता आणखी भलत्याच मार्गाचा विचार सुरू आहे. आधीच्या मार्गानुसार, जवळपास तीस टक्के भूसंपादन झालेही आहे. मात्र आता हा मार्ग थेट नाशिक-पुणे असा न होता पुणे-अहिल्यानगर-शिर्डी-नाशिक असा वळसा घेत करण्याचा घाट घातला जात आहे. या नव्या मार्गामुळे सुमारे शंभरावर किलोमीटरचे अंतर अन् तास-दीड तासाचा प्रवास वाढणार आहे. नवा डीपीआर म्हणजेच प्रकल्प अहवाल तयार करून नुकताच तो रेल्वे मंत्रालयाकडे सादर केला गेला असून येत्या काही दिवसांत त्यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
या नव्या मार्गाला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, खा. राजाभाऊ वाजे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आ. सत्यजित तांबे अशा अनेकांचा विरोध आहे. भुजबळांनी तर मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून या प्रस्तावित मार्गाला आपला कडाडून विरोध असल्याचे जाहीर केले आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील खोडद येथील जाएंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) या महाकाय आंतरराष्ट्रीय दुर्बिणीच्या प्रकल्पामुळे या मार्गावर तांत्रिक अडचणी येत असल्याचा मुद्दा पुढे आला आणि मग नवीन मार्गिकेच्या प्रस्तावावर विचार सुरू झाला. जुना मार्ग नाशिकरोड-सिन्नर-संगमनेर-नारायणगाव-मंचर-राजगुरुनगर-चाकण-पुणे असा आहे. याचा लाभ संगमनेर भागाला विशेषत्वाने होईल म्हणून तो संगमनेरऐवजी शिर्डीमार्गे व्हावा यासाठी सुरुवातीला मंत्री राधाकृष्ण विखेंनी प्रयत्न केले. थोरात-विखे संघर्षाचा या प्रकल्पाला असा फटका बसायला सुरुवात झाली होतीच. नंतर त्यात भर पडली ती खोडदच्या दुर्बिणीची! परिणामी विखेंच्या मनासारखे व्हायला सुरुवात झाली.
आता तर नाशिकचे सगळेच लोकप्रतिनिधी नव्या मार्गाला विरोध करत असले तरी छगन भुजबळ यांनी ज्याप्रकारे उघडपणे विरोध करून त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे ठरवले आहे, तेवढा आक्रमकपणा कोणीही दाखविला नाही. म्हणूनच जर भुजबळ पुढाकार घेणार असतील तर त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षभेद विसरून सर्वांनीच हा विषय तडीस न्यायला हवा. सध्या शिर्डी, श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर येथे रेल्वेमार्ग आहेत. त्या परिसराला पुन्हा हा नवा मार्ग जोडण्याची काहीही गरज नाही. खोडद येथील दुर्बिणीच्या भागातून हाच मार्ग भुयारी पद्धतीनेही नेला जाऊ शकतो, असे तेथील खासदार अमोल कोल्हे यांनी यापूर्वीच सांगितले आहे. त्या पुष्ट्यर्थ भुजबळ यांनीही मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे उदाहरण दिले. या मार्गावरील बीकेसी-ठाणेदरम्यानच्या २१ किलोमीटर लांबीच्या भूमिगत / समुद्राखालील बोगद्याच्या धर्तीवर बोगदा करून खोडद येथील तांत्रिक अडचण दूर होऊ शकते, असे भुजबळांनी दाखवून दिले आहे. भले त्यासाठी राज्य शासनाने खर्चाचा काही वाटा उचलण्याची तयारी ठेवावी, असेही त्यांनी सुचवले आहे.
कोल्हे यांनीही अशा काही पर्यायांची उदाहरणे दिली होती. मुख्यमंत्र्यांनी मात्र पद्धतशीरपणे त्यातून खुश्कीचा मार्ग काढून हे लोढणे केंद्राच्या गळ्यात अडकवले. आता या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च केंद्र शासन करणार असल्याचे सांगितले जात आहे. सोळा हजार कोटींच्या या प्रस्तावित प्रकल्पासाठी आयुष्यभराचे दुखणे राज्य सरकारने घेऊ नये, अशी विचारधारा आहे. मात्र, आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यात लक्ष घातले असून नव्या मार्गाचा डीपीआर तयारही झालेला असल्याने घिसाडघाईने याबाबतचा निर्णय झाल्यास नाशिककरांना हातावर हात धरून बसावे लागेल. तसे झाल्यास नाशिक-सिन्नर-संगमनेर या भागाच्या विकासावर परिणाम होईल. आजही नाशिकहून पुण्याला जाण्यासाठी रस्तामार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही. पुणे रेल्वे आहे पण ती कल्याणला वळसा घालून जात असल्याने या प्रवासात पूर्ण दिवस जातो.
मुंबई-पुणे-नाशिक या सुवर्ण त्रिकोणाच्या समृद्धीसाठीदेखील हा जुनाच मार्ग गरजेचा आहे. पुणे-अहिल्यानगर-साईनगर शिर्डी-नाशिक या प्रस्तावित नव्या मार्गामुळे तब्बल ८० किलोमीटरचा वळसा बसणार आहे. त्याचा सर्वाधिक फटका पुणे-नाशिक औद्योगिक पट्ट्यातील मालवाहतुकीसोबतच प्रवासी वाहतुकीला बसेल. नाशिककरांनी एक होऊन यासाठी आता पुढे यायला हवे. मध्यंतरी नाशिक सिटीझन फोरमच्या पदाधिकार्यांनी यादृष्टीने ना. छगन भुजबळ यांची भेट घेऊन चर्चा केली असता, त्यांनी यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. शिवाय लवकरच दिल्लीत जाऊन रेल्वेमंत्र्यांना भेटून आपले गार्हाणे मांडण्याबाबतही आश्वस्त केले आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासाठी जशी नाशिककरांनी काही वर्षांपूर्वी एकी दाखवली, त्यामुळे नाशिकला मुक्त व आरोग्य विज्ञान अशी दोन विद्यापीठे मिळाली. आता अशीच एकी दाखवताना कोणताही पर्यायी मार्ग मात्र न स्वीकारता जुन्याच मार्गाने पुण्याला द्रुतगतीने जाता यावे यासाठी ठाम राहावे लागेल.




