Wednesday, September 30, 2026
Homeनाशिकपडसाद : अतिक्रमण निर्मूलन की शक्तिप्रदर्शनाचा सोस?

पडसाद : अतिक्रमण निर्मूलन की शक्तिप्रदर्शनाचा सोस?

नाशिक | शैलेंद्र तनपुरे | संपादक, दै. देशदूत

अतिक्रमण निर्मूलनाच्या विषयावरून गेल्या आठवड्यात अ सत्तारुढ महायुतीतील (Mahayuti) दोन नगरसेवकांच्या शक्तिस्पर्धेत नाशिकरोड परिसरातील (Nashik Road Area) व्यावसायिकांची मात्र चांगलीच दमछाक झाली. नाशिकरोडच्या सर्वच व्यापारी पेठांमध्ये अतिक्रमणांचा सुळसुळाट आहे; आणि तो आजचा नाही. वर्षानुवर्षे असेच चालले आहे. व्यावसायिकांनी आपापल्या दुकानांपुढील मोकळ्या जागा, पदपथ तसेच पार्किंगसाठी सोडलेल्या जागा बळकावून आपले उखळ पांढरे करून घेतले, त्यालाही वर्षे लोटली. मधल्या काळात महानगरपालिकेत लोकप्रतिनिधींची सत्ता नसल्याने नोकरशाहीला रान मोकळे होते. कोणाचा धाक तर नव्हताच, शिवाय कोणाच्या हस्तक्षेपाचाही प्रश्न नव्हता.

- Advertisement -

अधिकाऱ्यांनी ठरविले असते, तर अशा हळूहळू पाय पसरी प्रवृत्तीच्या अनेक व्यावसायिकांना दणका देता आला असता. परंतु पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे असे अतिक्रमण म्हणजे जणू दररोजच्या मालमसाल्याची सोयच वाटली असावी. साहजिकच त्यांनी जे चाललंय ते तसंच पुढे चालू ठेवण्यात धन्यता मानली. अतिक्रमण निर्मूलन विभागात अमित पवार या दुसऱ्या खात्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याकडे काही जबाबदारी दिली गेल्यानंतर त्याने जो काही उच्छाद मांडला त्यालाही तोड नाही. या गृहस्थाला विभागीय अधिकाऱ्याने सांभाळले, पाठीशी घातले. आता त्याची चौकशी चालू आहे हा भाग अलाहिदा. एकूणच चांगल्या, निष्पक्ष, पारदर्शी कारभाराची सगळीकडेच बॉब असल्याने नाशिकरोडच्या कर्मचाऱ्यांकडून काही वेगळ्या अपेक्षाही ठेवता येत नाहीत.

लोकप्रतिनिधींची राजवट आल्यानंतर मात्र, सगळ्याच नगरसेवकांकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या. बिटको चौक ते मुक्तिधाम परिसर ही मोठी बाजारपेठ आहे. जेवढी पेठ मोठी तेवढी अतिक्रमणेही अधिक, हे जणू ठरूनच गेलेले आहे. साहजिकच, या अतिक्रमणांविरोधात भाजपच्या नगरसेविका जयश्री गायकवाड व सीमा ताजणे यांनी आवाज उठविला. अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेत काही हातगाड्या, टपऱ्या यांच्यावर कारवाई केली. आता हे चांगले की वाईट हा विषय राहिला बाजूला; पण शिवसेनेचे नगरसेवक कैलास मुदलियार मात्र यामुळे भडकले. त्यांनी ठराविक लोकांवरच कारवाई का केली अशी पृच्छा करीत इतर व्यावसायिकांच्याही अतिक्रमणांचा मुद्दा संबंधित ठिकाणी जाऊन उकरून काढला. अतिक्रमण अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन, अमूक काढा, तमक्यांचे अतिक्रमण तुम्हाला दिसले नाही का? असे सवाल करीत गायकवाड मळा परिसरातील अतिक्रमणांवर त्यांनी कारवाई करायला लावली. हे सारे करीत असताना त्यांनी त्याचे छायाचित्रण करीत रील्स बनवून ते समाजमाध्यमांवर टाकले. हल्ली ‘काम करण्यापेक्षा काम करीत असल्याचे दाखविणे’ अधिक महत्त्वाचे व गरजेचे झाल्याने, अगदी महासभेतही नगरसेवक आपापली सोशल मीडिया टीम घेऊन येतात आणि नंतर त्यांच्या वक्तव्याचे रील्स व्हायरल करतात.

नव्या जमान्याचे नवे फंडे म्हणून या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे म्हटले तरी काही बाबतीत करवत नाही. मुदलियार यांनी जयश्री गायकवाड या आपल्याच सहभगिनीचे नाव घेऊन जाहीर आक्षेप घेत बरीच बडबड केल्याचे या व्हायरल व्हिडीओतून दिसते. तत्पूर्वी जे अतिक्रमण काढले गेले त्यामुळे त्यांचा संताप झाल्याचा अर्थ त्यातून काढता येतो. आता प्रश्न असा पडतो की, अतिक्रमण काढले म्हणून त्यांना एवढा राग का आला? मुदलियार यांचे रेजिमेंटल प्लाझा या संकुलात कार्यालय असले तरी तेथे त्यांचे खरे साम्राज्य आहे. तेथील अतिक्रमणांवरील कारवाई म्हणजे आपल्या प्रभावालाच धक्का असे त्यांना वाटले असावे कदाचित. मुदलियार यांचा गणेशोत्सव एवढा प्रचंड भपकेबाज असतो की त्याच्या दर्शनाला शेकडो लोक येत असतात. दहा-बारा दिवस बिटको चौक ते देवळाली रस्ता हा एकतर बंद असतो किंवा एकेरी तरी करावा लागतो. पालिका, सिंहस्थ प्राधिकरण आणि पोलीस अशा तिन्ही विभागांचे आयुक्त दर्शनाला येतात, अशी ही खाशी स्वारी. मुदलियार यांनी नगरसेवक म्हणून निवडून (Elected) आल्यानंतर उत्तम काम चालविले आहे, यात शंकाच नाही. संभाजी मोरुस्कर यांच्यासारख्या भाजपच्या मातब्बर व कार्यक्षम ज्येष्ठ नगरसेवकाला पराभूत करून ते निवडून आले, यावरून त्यांच्या कार्याच्या प्रभावाचीही ओळख पटावी.

अनेक कामे तर ते स्वखर्चाने करीत असल्याचेही सांगितले जाते.तथापि, या विषयात हात घालून त्यांनी आपल्याच चांगल्या कार्याला खो दिला, पालिकेने निवडक अतिक्रमणे काढून पक्षपात केला होताच, त्याबद्दल महासभेत दाद मागता आली असती किंवा जयश्री गायकवाड यांनी काही पक्षपात केला असेल तर त्यालाही सभेतच तोडीस तोड उत्तर देता आले असते. परंतु आमच्या लोकांवर कारवाई केली म्हणून दुसरी अतिक्रमणे काढायला लावणे, त्याचे चित्रण करून ते व्हायरल करणे हे बरे नाही. लोकप्रतिनिधी म्हणून मिळालेल्या अधिकारांचा सुयोग्य वापर करायला शिकावे लागेल, चमकोगिरी करून चांगल्या कामावर पाणी फिरू शकते, पहिल्यांदाच निवडून आल्याने कदाचित मुदलियार यांच्यात जोश अधिक असू शकेल; पण प्रभागात चांगले, आदर्श काम करीत असताना अशा लहान-मोठ्या घटनांकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याचा सराव त्यांना करावा लागेल.यानिमित्ताने शिवसेना शिंदे गट व भाजपमधील सुप्त संघर्षालाही तोंड फुटलेले दिसले. शक्तिप्रदर्शनासाठी खरेतर बरेच विषय आहेत. या नगरसेवकांना अतिक्रमणाविषयी एवढाच राग असेल, तर त्यांनीही रस्त्यावर उतरून ही कारवाई संयुक्तपणे करावी. पण, परस्परांच्या हितसंबंधाला बाधा पोहोचविण्याचे प्रयत्न झाले, तर भविष्यात केवळ सुडाचेच राजकारण चालेल.

ताज्या बातम्या

default-featured-image

Rohit Pawar : गृहखात्याचा पोलिसांवर वचक राहिला नाही; रोहित पवारांचा राज्य...

0
नाशिक | Nashik राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची (Law and Order) परिस्थिती गंभीर बनली असून, गृहखात्याचा पोलिस (Police) प्रशासनावर कोणताही वचक राहिलेला नाही, असा आरोप राष्ट्रवादी...