Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपडसाद : कायद्याच्या बालेकिल्ल्यात त्र्यंबकलाही घ्या

पडसाद : कायद्याच्या बालेकिल्ल्यात त्र्यंबकलाही घ्या

नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – सल्लागार संपादक

‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ ही घोषणा सध्या पोलिसी खाक्याची जणू घोषवाक्य बनली आहे. केवळ नाशिकच नव्हे तर संपूर्ण राज्यात या कर्णिक पॅटर्नचा बोलबाला सुरू आहे. पुण्यातील अधिकार्‍यांनीही या पॅटर्नचा अवलंब करून गुन्हेगारीचा बीमोड करण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेना उबाठाचे नेते खासदार संजय राऊत यांनीही पुणे पोलिसांना टोमणे मारताना का होईना पण या नाशिक पॅटर्नचे कौतुक केले. राऊत सहसा कोणाला बरे म्हणत नाहीत, पण नाशिक पोलिसांच्या कारवाईचे त्यांनी गुण गायले यातच सारे आले. नाशिक शहरात पोलिसांनी सध्या गुंड-पुंड यांना लक्ष्य केले असतानाच ग्रामीण पोलिसांमध्येही उत्साह संचारला आहे.

जिल्हा पोलीसप्रमुख बाळासाहेब पाटील यांनी तालुक्यातील आपल्या सर्वच शागीर्दांनाही कायद्याची बूज राखण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर लासलगाव व त्र्यंबकेश्वर येथे टवाळखोर तसेच गुंडांची धिंड काढून पोलिसांनी ग्रामस्थांचा दुवा घेतला. ज्याप्रमाणे नाशिकला गुंड व त्यांचे बगलबच्चे आणि त्यांना राजकीय आश्रय देणार्‍यांना वेचून कारवाया केल्या जात आहेत, त्याचप्रकारे ग्रामीण भागातील गुंड व त्यांच्या आकांनाही धडा शिकवण्याची गरज व्यक्त आहे. मध्यंतरी त्र्यंबकेश्वरला काही पत्रकारांना झालेल्या मारहाणीमुळे थेट मुख्यमंत्र्यांपासून अनेक वरिष्ठांनी दखल घेतल्याने या पवित्र नगरीची गुंडांमुळे होत असलेली दुर्दशा तरी माहिती झाली. पर्यटक भाविकांची लूट करणार्‍यांकडे तसेच राजकीय आशीर्वादाच्या जोरावर भूमाफिया झालेल्यांवर पोलीस कधी कारवाई करणार, असा सवालही सध्या विचारला जात आहे.

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंगामुळे वैश्विक भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने केवळ देशातूनच नव्हे तर जगभरातून भाविक येत असतात. साधारण पन्नास हजारांहून अधिक भाविक दररोज येतात, असा अंदाज आहे. श्रावण व सणासुदीच्या काळात तर हाच आकडा कितीतरी पटीने वाढतो. साधारण सर्वच तीर्थक्षेत्री भाविकांची लूट कमी-अधिक प्रमाणात होत असली तरी नाशिकमध्ये अगदी इतर प्रांतातील गाड्यांचे क्रमांक पाहून केली जाणारी अडवणूक, दिला जाणारा त्रास हे सारे भयानक आहे. या गुंडगिरीला काही स्थानिक पोलिसांचाही हातभार लागतो, हे काही लपून राहिलेले नाही. या प्रकारांमुळे केवळ त्र्यंबकेश्वरच नव्हे तर नाशिकचे नाव खराब होते, याबाबत वेळोवेळी प्रशासनाच्याही कानावर घातले आहे. परंतु त्याला काही उतार पडलेला नाही. आता प्रथमच त्र्यंबकेश्वर शहरात काही टवाळखोरांवर कारवाई करण्याचे धाडस केले गेल्याने स्थानिक नागरिक तसेच छोटे-मोठे व्यापारी यांनी समाधान व्यक्त केले आहे.

YouTube video player

त्र्यंबकेश्वरमधील टवाळखोरांवर कारवाई करून एका चांगल्या मिशनची सुरुवात पोलिसांनी केली आहे. आता भूमाफियांनी गेल्या काही वर्षांपासून चालविलेल्या धाकदपटशाहीचाही बीमोड करायला हवा. सुदैवाने नाशिक शहर पोलिसांनी लोंढे टोळीचे कंबर मोडले आहेच, आता ग्रामीण पोलिसांनी याच टोळीच्या स्थानिक उद्योगांना रडारवर घ्यायला हवे. लोंढेंच्या बगलबच्च्यांनी स्थानिक रहिवासी, आदिवासी, व्यापारी व येणार्‍या भाविकांनाही सळो की पळो करून सोडले आहे. काही भूमाफिया हे व्हाईट कॉलर असून वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून गावभर मिरवित असतात. आमदार-खासदारांचे निकटवर्तीय असल्याचे भासवून अनेक उद्योग बिनबोभाट चालू आहेत. झारवड, आळवंड, देवगाव भागात आदिवासी बांधवांच्या तसेच धरणांच्या जमिनी आहेत. अशा जमिनी धाक दाखवून नावावर करवून घेणे हा तर नियमित धंदा झाला आहे. लोंढे नाना हे महाशय तेथे दानशूर म्हणूनही ओळखले जातात.

त्र्यंबकेश्वर येथील माहेश्वरी धर्मशाळेच्या जागेवर बागुल टोळीने अतिक्रमण करून थेट गाळे बांधण्याची मनमानी केली गेली. गजानन महाराज संस्थानजवळील आरक्षणातील जागेवरही अतिक्रमण करण्याचे धाडस केले गेले. प्रशासनाकडे तक्रार करूनही उपयोग होत नाही, अशी स्थिती आहे. पत्रकार मारहाण प्रकरणातील सोनू खाटीकडे हा कुणाचा कार्यकर्ता आहे, याची माहिती पोलिसांना असेलच, किमान आता या परिस्थितीचा फायदा उठवून अशा गुंडांची गठडी वळली तरच या धर्मक्षेत्राचे पावित्र्य खर्‍याअर्थाने टिकू शकेल. तालुक्याचे आमदार हिरामण खोसकर यांनीही खरे तर अशा प्रकरणात लक्ष घालायला हवे. त्यांच्या नावानेही काही जण अनेक उद्योग करून आमदारांचे नाव खराब करीत आहेत. हे वेळीच थांबले नाही तर भविष्यात मोठीच अडचण होऊन बसेल. लोंढे टोळीचा सक्रिय सदस्य असलेल्या एका माजी नगरसेवकाचे कारनामेही यानिमित्ताने तपासण्याची गरज आहे. गुंडांचा माज वाढण्यास जमिनीचे व्यवहार बळ देतात. यातून मिळणारी बक्कळ रक्कम अलिशान एसयूव्ही सारख्या गाड्या घेणे, अंगावर सोने घालून माज करणे यासाठी वापर होतो. अशांकडे अचानक श्रीमंती कशी आली याचा मागोवा घेतला पाहिजे.

सोन्याचा भाव आलेल्या जमिनीच्या लोभापायी अनेक धनाढ्य, राजकीय कार्यकर्ते आणि गुंड यांच्या अभद्र युतीमुळे वातावरण खराब झाले आहे. गेल्यावर्षी नीलेश परदेशी याची गोळीबारात हत्या झाली. त्या तपासाचे पुढे काय झाले, हेदेखील लोकांना कळायला हवे. जमिनीच्या व्यवहारात कोणी आडकाठी केल्यास काय होऊ शकते हे दर्शवून दहशत माजवण्यासाठी हा खून केला गेल्याचा संशय आहे. पण त्याच्या खोलात कोणी गेले नाही. आता ‘कायद्याचा बालेकिल्ला’ सिद्ध करण्यासाठी अशा प्रकरणांची जुनी असली तरी मढी उकरून खर्‍या दोषींना शिक्षा करायला हवी. नाशिकसारख्या महानगरापेक्षाही गंभीर प्रकार त्र्यंबकमध्ये बडी म्हणवली जाणारी माणसे करीत असल्याने तेथील साखळी तोडायची जिगर दाखवावी लागेल. सुदैवाने टवाळखोरांवर कारवाई करून स्थानिक पोलिसांनी गुन्हेगारांना योग्य तो संदेश दिला आहेच. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीची साफसफाई मोहीम करून या भूमीचे पावित्र्यही जपावे, हीच अपेक्षा.

ताज्या बातम्या

Nashik News : पोलिसांच्या सतरा सेवा ‘ऑनलाईन’; ‘आपले सरकार’ पोर्टलवर सुविधा

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि वेळबद्ध सेवा मिळाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या 'आपले सरकार' पोर्टलवर पोलिसांच्या गृह विभागास प्राधान्य...