नाशिक | शैलेंद्र तनपुरे- दै. ‘देशदूत’ – संपादक
प्रमोद महाजन (२००६), विलासराव देशमुख (२०१२), गोपीनाथ मुंडे (२०१४) आर. आर. पाटील(२०१५) आणि आता अजितदादा पवार.. महाराष्ट्राने गेल्या वीस वर्षात ही हिरेमाणकं अकाली गमावली. सगळीच धुरंधर होती. वयानेही तशी तरुण होती. आवाका अर्थातच राज्यव्यापी होता. महाराष्ट्राला पुढे नेण्याची हिंमत व क्षमता असलेले हे सारे नेते मनीध्यानी नसताना सोडून गेले. आता तर अजितदादांसारखा खर्याअर्थाने खमका नेता गेल्याने महाराष्ट्र पोरका झाल्याची रास्त भावना उमटली आहे. विलासराव व आर. आर. आबा आजारपणात गेले असले तरी त्यांचे जाणे धक्कादायकच होते. गोपीनाथ मुंडे केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी घेऊन राजकीय कारकिर्दीची नवी इनिंग खेळण्यास सज्ज असतांना नियतीने त्यांना दगा दिला.
प्रमोद महाजन तर देशव्यापी प्रतिमा घेऊन महाराष्ट्राला आणखी महान करण्यात अग्रेसर असतांना त्यांची दुर्दैवी हत्या झाली. आता अजितदादांचेही असे विमान अपघातात जाणे जीवाला चटका लावणारे आहे. दिवसभरात दूरचित्रवाणीवरील दृश्य पाहिल्यानंतर अजितदादांचे जाणे आणखीच काळजात रुतते. शरद पवार यांचे पुतणे ही ओळख असली तरी अजितदादांनी आपल्या कर्तृत्वाने ती आणखी ठळक केल्याचे दिसते. तब्बल ४४ वर्षे राजकारणात सक्रिय राहताना त्यांची प्रशासनावरील पकड कायमच चर्चेत राहिली. अगदी ते प्रथमच पुणे जिल्हा बँकेवर निवडून गेले आणि अध्यक्ष झाले तेव्हापासूनच या राज्याला वक्तशीर, बेधडक प्रशासक लाभला होता. त्याचवर्षी म्हणजे १९९१ साली ते लोकसभेवर निवडून गेले. पुन्हा त्याच वर्षी ते विधानसभेवर गेले आणि सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळात मंत्रीही झाले.
एखाद्याच्या आयुष्याचा पट कसा वळणावळणाने समृद्ध होत जातो, याचे प्रत्यंतर अजितदादांच्या या सुरुवातीच्या कारकिर्दीत दिसते. पुणे जिल्हा बँकेवर सोळा वर्षे ते होते. तेव्हापासून ते आजपर्यंतही बँक सदैव प्रगतीपथावर राहिली. सहकारी बँक असतांनाही ती कधी आजारी पडली नाही की तिच्यावर कोणत्याही कारणाने कधी काही बंधने आली. अजितदादांच्या कणखर प्रशासनाची ती पावती होती. त्यामुळेच दादा जेव्हा केव्हा नाशिकला सहकारी संस्थांच्या कार्यक्रमांना यायचे तेव्हा प्रत्येकवेळेस ते त्या संबंधित संस्थांचा लेखाजोखा मांडून आपल्याच निकटवर्तीय नेत्यांना शाब्दिक डोस पाजायचे. संस्था कशा चालवाव्यात याचे जाहीर धडे ते द्यायचे.
नाशिक जिल्हा बँक असो किंवा निफाड सहकारी साखऱ कारखाना किंवा बाजार समित्या, अजितदादांनी नेहमीच त्यांच्यातील उणीवा थेटपणे सांगून कर्त्याधर्त्या नेत्यांना खडे बोल सुनावतांना अनेकांनी अनुभवले आहे. प्रशासनावरील त्यांची पकड ही काही प्रासंगिक नव्हती. ती त्यांनी अभ्यासातून कमावली होती. प्रत्येक खाते, विषय यांचा अभ्यास ते करायचे. नेहमी अपडेट असायचे. त्यामुळेच त्यांना कात्रजचा घाट दाखविण्याची कधी कोणी हिंमत केली नाही. कार्यकर्त्यांना सांभाळणे असो वा त्यांना बळ देणे, दादांनी कधीच हात आखडता घेतला नाही. नाशिकचीच उदाहरणे द्यायची झाली तर माजी खासदार देविदास पिंगळे, माणिकराव कोकाटे, दिनकर आढाव, निवृत्ती अरिंगळे, दिलिप बनकर, नरहरी झिरवाळ, नितीन पवार, सरोज अहिरे अशी अलिकडची असंख्य उदाहरणे देता येतील.
या प्रत्येकाला त्यांच्या अडचणीच्या काळात दादांनी विश्वास दिला आहे. माणिकराव कोकाटेंचे उदाहरण तर ताजे आहे, समस्त राज्यात त्यांच्याविषयी बोलले जात असताना दादांनी त्यांना प्रत्येकवेळी समजून घेत दिलासा दिला. मात्र, चुका असतील तर दादांनी त्या कधी पोटात घेतल्या नाहीत. जिल्हा बँकेच्या काही प्रकरणात तेव्हा दादांकडेच दाद मागितली जायची. पण दादांनी आधी बँकेचे हित, नंतरच तुमची बाजू बघू अशीच भूमिका नेहमी ठेवली. सध्या नाशिक जिल्हा बँकेला वाचविण्याची जी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे त्यामागे दादांचाच आशीर्वाद आहे, हे सगळेच मान्य करतील. जे योग्य ते त्यांना कोणत्याही स्थितीत मान्य असायचे; पण जे अयोग्य त्याला त्यांनी कधी साथ दिली नाही. नाशिकरोड व्यापारी बँकेत शिवसेनेचे दत्ता गायकवाड अध्यक्ष असतानाही दादा बँकेला भेट द्यायला आले आणि बँकेची परिस्थिती पाहून सर्वांचे कौतुकही केले.
विरोधकांची बँक आहे म्हणून लावा चौकशा, असा उद्योग दादांनी कधी केला नाही. विशेष म्हणजे अधिकार्यांना हाताशी धरून विरोधकांना नामोहरम करण्याचा विचारही कधी त्यांच्या मनाला शिवला नाही. रुढार्थाने ते लोकनायक होते, पण त्याला कणखर प्रशासकाच्या गुणांचे कोंदण लाभले होते. त्यात खुनशीपणाला जागा नव्हती. राष्ट्रवादीतून बाहेर पडतानाही त्यांनी निकटवर्तियांना सोबत येण्याचे आवाहन केले होते. जे आले त्यांना सोबत घेतले, पण जे आले नाही त्यांना त्रास देण्याचा विचारही नंतर त्यांनी सत्तेत आल्यावर केला नाही. एवढेच काय पण गेल्या काही काळात एकमेकांची माणसं फोडण्याची मोहीम सुरू असतानाही दादा कधीच त्या स्पर्धेत उतरले नाही. पुरोगामी विचारसरणीचा खंदा पुरस्कर्ता असल्याचा बाणा त्यांनी हिंदुत्ववादी पक्षाबरोबर समझोता करतानाही सोडला नाही, ही त्यांची खासियत विरळाच. अशा या लोकोत्तर व्यक्तिमत्वाला ङ्गदेशदूतफ परिवाराची आदरांजली.




