नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – सल्लागार संपादक
आधुनिक नाशिकचा आणखी एक चिरा इतिहासात जमा होऊ पाहत आहे. पन्नास वर्षांपूर्वी सुरु झालेली बी. डी. भालेकर शाळेची इमारत अखेरचा श्वास घेत आहे. ही शाळा व तिची ही इमारत जिवंत राहावी यासाठी अंमळ उशिराने को होईना, पण विविध राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. निवेदने, आंदोलनाचे हत्यार उपसले जात आहे. महापालिका प्रशासन या शाळेच्या इमारतीला मूठमाती देण्यावर ठाम आहे. त्यांना कोणाच्याही भावनांशी काही एक देणेघेणे नाही. आयुक्त बाहेरच्या आहेत हे समजू शकते. परंतु अनेक अधिकारी तर नाशिकचेच आहेत ना? त्यांनाही काही वाटू नये याचे आश्चर्य वाटते.
पालिकेच्या सेवेत असलेले, विशेषत: असंख्य सफाई कामगार यांनी तर या शाळेतच’अबकडई’ गिरवले आहेत. त्यांनाही ही आपली शाळा वाचावी, असे वाटत नसेल तर मग सगळेच संपले. मुळात गेल्या दहा ते बारा वर्षांपासून शाळेने तसाही राम म्हटलेला आहेच. नाही म्हणायला बी. डी. भालेकर या नावाची शाळा सध्याही भरते आहे, पण ती सातपूरला! कारण बारा वर्षांपूर्वी जेव्हा या शाळेत पाचवी ते दहावी मिळून अवघे ५७ विद्यार्थी उरले तेव्हा एवढ्या कमी विद्यार्थ्यांसाठी एवढी मोठी इमारत अडकून ठेवणे योग्य नाही, असा विचार तत्कालिन अधिकार्यांनी केला. तेव्हाच्या लोकप्रतिनिधींनीही तेव्हा शाळेच्या उध्दारासाठी काही विशेष प्रयत्न केल्याचे स्मरत नाही. आता शाळेच्या इमारतीवर हातोडा पडणार असल्याचे दिसताच सर्वांनाच शाळा वाचविण्याचा पुळका आला आहे. गेली दहा-बारा वर्षे ही मंडळी नेमकी काय करीत होती, असा सवाल विचारला तर त्यांना आवडणार नाही. अर्थात तरीही त्यांनी किमान अखेरच्या क्षणी का होईना, पण ही इमारत शाळेसह वाचवण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत, त्याला दाद द्यावी लागेल.
बी. डी. भालेकर ही शाळा व तिची इमारत आधुनिक नाशिकच्या इतिहासातील एक ओळखीचे चिन्ह आहे. सर्वच प्रकारच्या निवडणुकांमध्ये असलेले मतदान केंद्र, तेथे हमखास रात्री उशिरापर्यंत चालणारे मतदान तसेच होणार्या हाणामार्या वा तणावाची परिस्थिती यासाठी जवळपास सर्वच नाशिककरांच्या तोंडी भालेकर हायस्कूलचे नाव असते. परंतु कोण हे भालेकर, शाळेला त्यांचे नाव कसे? या प्रश्नांची उत्तरे काही नव्या पिढीला माहिती नाहीत. ती कोणी सांगावीत तर जुन्या मंडळींनाही त्याचा फारसा इतिहास माहीत नाही. इतिहास एकदा विसरला की, मग ती वास्तू असो वा व्यक्ती; तिचे भूतलावरील अस्तित्वही आपसूक संपते. या शाळेचे दुर्दैवाने तसेच होऊ पाहत आहे. ज्यांच्या नावाने ही शाळा आज सांगाड्याच्या रुपात का होईना पण उभी आहे, ते बाळकोबा धोंडिबा भालेकर म्हणजेच सर्वतोमुखी झालेले बी. डी. भालेकर! ते सारडा कन्या विद्यालयासमोर शेंगा विक्रीचा व्यवसाय करीत असत. वास्तविक एका शेंगा विकणार्या माणसाचे एका शाळेला नाव कसे पडले? याची तरी माहिती नाशिककरांनी ठेवायला हवी होती. कारण अशा कथा या केवळ रंजक नसतात तर पुढील पिढ्यांसाठी प्रेरकही असतात.
भालेकरांना कोणीही नातेवाईक नव्हते. एकाकी जीवन कंठत होते. शेंगा विक्रीतून जी काही पुंजी जमा व्हायची त्यातील जगण्यासाठी म्हणून जे लागे ते घेऊन उर्वरित रक्कम ते बाजूला ठेवत. अशी उरलेली रक्कम त्यांनी भालेकर शाळा सुरु झाली तेव्हा दान केली. त्याकाळी म्हणजे १९७०-७१ सालच्या दरम्यान ही रक्कम होती तब्बल ५१ हजार! एका शाळेसमोर हयातभर शेंगा विकणारी व्यक्ती आयुष्याची पुंजी शालेय कामासाठीच दान करतो, यात संस्कारांबरोबरच शिक्षणाविषयीची असोशी दिसते. या दानशूरपणासोबतच शिक्षणासंदर्भातील कळकळीची ही गाथा नव्या पिढीसमोर यायला हवी होती. दुर्दैवाने आजही भालेकर सर्वार्थाने दुर्लक्षित आहेत. शाळेला त्यांचे नाव दिले ते तत्कालिन नगराध्यक्ष डॉ. वसंतराव गुप्ते यांनी! त्यांचा व भालेकरांचा स्नेह होता. गुप्ते हे थेट नगराध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी तत्कालिन प्रस्थापितांना दूर सारले होते. हा आनंदही कदाचित भालेकरांसारख्या सामान्य माणसाला ही देणगी देण्यास प्रवृत्त कारणीभूत झाला असावा. यासोबतच आणखी एका परिवाराला नाशिककर ठार विसरले आहेत. भालेकरांनी देणगी दिल्यामुळे त्यांचे किमान नाव तरी अस्तित्वात आहे, पण भालेकर हायस्कूल व त्यासमोरील जागा ही कोणाची? ती कोणी दान केली? याचीही फारशी माहिती नाही. पीरजादे परिवाराची ही तेव्हाची कब्रस्थानाची राखीव जागा होती. तेव्हा ही शाळा जुन्या नाशिकमध्ये भरत असे.
विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहून नव्या जागेची गरज भासू लागली. तेव्हा पीरजादे परिवाराने केवळ शैक्षणिक कार्यासाठीच, अशी अट टाकून ही जागा तत्कालिन नगरपालिकेला दिली. नाशिककरांच्या विस्मरणात गेलेल्या या दोन्ही घटना दानशूरपणाबरोबरच शैक्षणिक संस्कारासाठीही सातत्याने आठवण्याची गरज आहे. आजच्या जिहादी वातावरणात तर हे हेतूत: जनतेसमोर आणण्याची गरज आहे. आपले व परके करण्यात आपण किती मोठा वारसा काळाच्या उदरात ढकलतो आहोत, याची कोणालाही पर्वा नाही. पीरजादे परिवाराने समजा जागा दिलीच नसती तर आज ज्या शाळेच्या इमारतीच्या पाडकामावरुन रान पेटले आहे ते पेटलेच नसते. तसेच भालेकरांनी देणगी दिली नसती तर शाळेची इमारत कदाचित उभीदेखील राहू शकली नसती. नाशिककरांनी अभिमानाने गौरवावे असे हे कर्तृत्व जीर्ण झालेल्या इमारतीबरोबर कदाचित झाकोळलेही जाईल, पण यानिमित्ताने त्या व्यक्तिमत्वांचा आणि अर्थातच त्यांच्यामुळे उभ्या असलेल्या इमारतीचा आठव तरी झाला. तो यापुढे कायम स्मरणात राहावा, ही अपेक्षा. (क्रमश:)




