नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये काल (दि.२२) रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Terrorist Attack) २६ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या वेशात आलेल्या काही दहशतवाद्यांनी काश्मीर फिरायला आलेल्या पर्यटकांना त्यांचं नाव आणि धर्म विचारत गोळ्या घातल्या. यामध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) ६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता पर्यटकांवर गोळीबार करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा फोटो समोर आला असून, त्यातील दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील महिनाभरापासून हे सर्व दहशतवादी (Terrorist Attack) पहलगाम परिसरात सक्रीय होते. त्यांनीच महिनाभर सर्व भागाची रेकी केल्यानंतर हा हल्ला घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, यांनीच हा हल्ला केला का? याबाबतची पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही. पंरतु, दहशतवादी हल्ला करण्यासाठी आवश्यक असणारी तयारी याच दहशतवाद्यांनी केल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांपैकी दोघेजण पश्तून भाषेत बोलत असल्याचीही माहिती मिळाली आहे. या दहशतवाद्यांनी सुमारे १५ ते २० मिनिटे एके-४७ च्या माध्यमातून गोळीबार (Firing) करत पर्यटकांना टिपून टिपून लक्ष्य केल्याचेही समोर आले आहे. तर सदर घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून, काश्मिरातील नागरिकांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे.
दरम्यान, हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांपैकी दोघा स्थानिक दहशतवाद्यांची नावं आदिल गुरी आणि आसिफ शेख असल्याची माहिती मिळाली आहे. या दोघांसोबत आणखी दोन पाकिस्तानी दहशतवादी होते. पहलगाममध्ये काल झालेल्या या तर या हल्ल्याची जबाबदारी लष्कर ए तोयबाशी संबंधित द रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. सुरक्षा यंत्रणांकडून दहशतवाद्यांचे स्केच काही वेळापूर्वी जारी करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांचा फोटो समोर आला आहे. हा भ्याड हल्ला करण्यापूर्वीचा हा दहशतवाद्यांचा फोटो असल्याचे म्हटले जात आहे.