मुंबई | Mumbai
मंगळवारी काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि महाराष्ट्रासह देशभरातले २६ पर्यटकांना या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला. पहलगाम या ठिकाणी जे पर्यटक मारले गेले त्यात महाराष्ट्रातल्या सहा पर्यटकांचा समावेश होता. या सहापैकी तीन जण डोंबिवलीचे होते. अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी या तीन मावस भावांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. यानंतर संजय लेलेंचा मुलगा हर्षल याने या हल्ल्याचा थरार सांगितला. जोशी, लेले आणि मोने कुटुंबाने एकत्र पत्रकार परिषद घेत त्यात त्यांनी हल्ल्याच्या वेळी घडलेली थरारक कथा सांगितली.
अतुल मोने यांच्या पत्नी अनुष्का मोने यांनी सांगितले की, आम्ही दुपारी १.३० च्या सुमारास तिथे पोहचलो. तिथे पर्यटकांची खूप गर्दी होती. आम्ही सर्व आनंदी होतो. ऊन खूप असल्यामुळे आम्ही पाणी पिण्यासाठी आणि थोडे काही खाण्यासाठी एका स्टॉलवर गेलो. आमचे तिथे खाऊन झाल्यावर आम्हाला शुटींगचा आवाज आला. आम्हाला सुरुवातीला वाटले की, पर्यटन स्थळ असल्यामुळे या ठिकाणी गेम्स असतील, असे समजून आम्ही लक्ष दिलं नाही. पण नंतर अचानक फायरिंग चालू झाली आणि सगळीकडे गोंधळ उडाला. तिथे उपस्थित सगळेच लोक घाबरले. आम्ही सगळे खाली झोपलो.
घरातील कर्त्या पुरुषाला मारले
अनुष्का मोने म्हणाल्या की, दहशतवादी आमच्याजवळ आल्यावर माझे पती त्यांना म्हणाले की, आम्हाला गोळ्या मारू नका. पण दहशतवाद्यांनी आम्हाला विचारले तुमच्यापैकी हिंदू कोण आणि मुस्लिम कोण? जिजूंनी हात वर केला, तर त्यांना गोळ्या घातल्या. आमच्यासमोर आमच्या तिघांना गोळ्या घालण्यात आल्या. हे आमच्या घरातले कर्ते पुरुष होते आणि आम्ही त्यांना वाचविण्यासाठी काहीही करू शकलो नाही. अशा बऱ्याच जणांना त्यांनी मारले आहे. दहशतवादी गेल्यानंतर आम्ही त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाला काही करता आले नाही. अनेकांनी आम्हाला तुम्ही तुमचा जीव वाचवून जा असे सांगितले”.
सरकारने आम्हाला न्याय मिळवून द्यावा
“तुम्ही लोकांनी येथे दहशत निर्माण करुन ठेवली आहे असे दहशतवादी बोलत होते. असे बोलताना ते फायरिंग करत होते. पर्यटक फक्त फिरायला येतात त्यांचा काय गुन्हा आहे? सरकारने यावर कारवाई करत आम्हाला न्याय मिळवून द्यावा,” अशी मागणीही त्यांनी केली आहे.
बाबांचे डोके रक्ताने माखलेले होते
संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले याने पहलगाममध्ये नक्की काय घडले? याची हादरवणारी कहाणी सांगितली. तो म्हणाला की, ‘आम्ही तिथे आदल्यादिवशी आलो होतो. तिकडून ज्यावेळी गोळ्या चालल्या, त्यावेळी माझा हात माझ्या वडिलांच्या डोक्यावर होता. माझ्या हाताला तेव्हा काहीतरी जाणवले, मला असे वाटले की माझ्या हाताला गोळी लागलीय. नंतर मी जेव्हा उठून पाहिले, तेव्हा मी माझ्या बाबांचे डोके बघितले, ते पूर्ण रक्ताने माखलेले होते. मी जेव्हा सर्व बघितले तेव्हा तिथल्या स्थानिकांनी सांगितले की, यांना जर मदत पोहोचवायची असेल तर आर्मीवाले येतील. आधी तुम्ही तुमचा जीव वाचवा आणि इथून निघून जा, आणि तो स्पॉट असा होता की, तिथे वर जायला तीन तास लागतात, ते पण घोड्याने.’
‘मग तिथे सर्व घोडेवाले आले त्यांनी एकेकाला घोड्यांनी खाली पाठवायला सुरुवात केली, उरलेले बाकी चालत खाली उतरत होते. त्यामुळे आम्हाला खाली उतरायला चार तास लागले. माझ्या आईला पॅरालिसीस आहे, त्यामुळे माझ्या भावाने आणि मी तिला उचलून काहीवेळ चालत खाली आणले, मग ती स्वत: चालत आली. त्यानंतर जो आमचा घोडा होता, ज्याने आम्हाला वर आणले, तो नशिबाने तिथे पोहोचला. मग आम्ही आईला घोड्यावर बसवून आईला खाली पाठवले. मी आणि माझा भाऊ चार तास चालत आलो.’ दरम्यान, हल्ल्याचा थरार सांगताना हर्षलला अश्रू अनावर झाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा