नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कठोर निर्णयांवर पाकिस्तानने आज आक्रमक पवित्रा घेतला असून अनेक द्विपक्षीय करार रद्द करत युद्धजन्य पावले उचलण्याचा इशारा दिला आहे. सर्व भारतीय मालकीच्या किंवा भारतीय संचालित विमान कंपन्यांसाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र तात्काळ बंद करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. तसेच अटारी वाघा बॉर्डर पोस्ट तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतासोबत होणारा व्यापारही बंद करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे भारताने पाकिस्तान या दहशतवाद्यांना लाँचिंग पॅड, शस्त्रे उपलब्ध करून देत असल्याचा आरोप केला आहे. तसेच आयएसआय या दहशतवाद्यांमागे असल्याचा आरोप केला आहे. पाकिस्तानविरोधात कारवाई करण्यात आली असून दहशतवादाविरोधात आता भारताने कठोर पाऊले उचलायला सुरूवात केली आहे. भारताने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा बंद केला. तसेच ४८ तासांमध्ये पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा आदेश दिला.
पाकिस्तानच्या एनएससी बैठकीत भारताने अद्याप दहशतवादी हल्ल्याचे पुरावे पाकिस्तानला दिलेले नाहीत, असे म्हटले आहे. तसेच पाणी रोखणे म्हणजे युद्धासारखीच कारवाई असल्याचा आरोप केला आहे. भारत हवाई हल्ला करू शकतो, यामुळे भारतीय मालकीच्या प्रवासी विमानांना ये-जा करण्यासाठी हवाई क्षेत्र बंद केले आहे. याचबरोबर पाकिस्तानने भारतासोबतच्या सर्व व्यापारावर बंदी घातली आहे. पाकिस्तानने वाघा बॉर्डरही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर शिमला करारही निलंबित करण्यात आला आहे. तसेच शीख धार्मिक तीर्थयात्री सोडून जे भारतीय आहेत, त्याचा व्हिसा देखील रद्द करण्यात येत आहे. या लोकांनी ४८ तासांत पाकिस्तान सोडावे असे आदेश देण्यात आले आहेत.
पाकिस्तानने काय निर्णय घेतले?
भारतासोबत सुरू असलेला व्यापार बंद. भारताच्या माध्यमातून इतर कोणत्याही देशासोबत व्यापार नाही
भारतीयांचा सार्क व्हिसा रद्द करणार.
भारतीय उच्चायुक्तालयातील लष्कर सल्लागारांना भारतात परतावे लागणार.
वाघा अटारी बॉर्डर बंद.
इस्लामाबादमधील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांची संख्या ३०वर आणणार.
भारतीय विमानांसाठी पाकिस्तानी एअरस्पेस बंद.
शिमला करार आणि सर्व द्विपक्षीय करार पाकिस्तानने तात्काळ निलंबित केले. जोपर्यंत भारत आपली भूमिका बदलत नाही.
भारताने काय निर्णय घेतले?
सिंधू पाणी करार स्थगित.
पाकिस्तानी दूतावासातील आकार कमी करण्याचा आदेश.
पाकिस्तानी नागरिकांसाठी भारतीय व्हिसा बंद.
अटारी वाघा बॉर्डर १ मे पर्यंत बंद राहणार.
भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालय बंद.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा