नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने (India) पाकिस्तानसोबत (Pakistan) असलेला सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. या करारासंदर्भात शुक्रवारी (दि.२५) गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या निवासस्थानी पाण्याचे व्यवस्थापन आणि वापराबाबत बैठक झाली. या बैठकीत परराष्ट्रमंत्री, जलशक्तीमंत्री आणि तिन्ही मंत्रालयांचे सचिव स्तरावरील अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत्त पाकिस्तानला जाणारे पाणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
केंद्रीय जलसंपदामंत्री सी. आर. पाटील (Union Water Resources Minister C R Patil) म्हणाले की, सिंधू पाणी कराराबाबत (Indus Water Treaty) घेतलेल्या निर्णयाचे पालन केले जाईल. हा निर्णय तीन टप्प्यांत लागू केला जाईल. तत्काळ, मध्यावधी आणि दीर्घकालीन. एक थेंबही पाणी पाकिस्तानात जाऊ नये, यासाठी व्यवस्था केली जाईल. भारताच्या या कारवाईचा (Action) परिणाम लवकरच पाकिस्तानवर दिसून येईल.
भारतातून पाकिस्तानला जाणारे पाणी थांबवल्यानंतर धरणांची (Dam) क्षमता वाढवली जाईल. धरणांची क्षमता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, जेणेकरून जास्त पाणी साठवता येईल. यासाठी धरणांमधील गाळ काढला जाईल. धरणांचे फ्लशिंगदेखील केले जाईल. हा करार जागतिक बँकेने केला होता, त्यामुळे त्यांनाही भारत सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली जाईल.
पाकिस्तान्यांना शोधा – शहा
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. याचाच भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि त्यांना त्यांच्या राज्यात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवण्याचे निर्देश दिले. ही यादी लवकरात लवकर केंद्राला पाठवावी, जेणेकरून त्यांचे व्हिसा तत्काळ रद्द करता येतील आणि त्यांना भारताबाहेर पाठवला येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. पहलगामा दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना टीआरएफचा हात असल्याचे समोर आल्यानंतर याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलयाला सुरुवात केली आहे.
त्यानुसार गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शहांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या राज्यात राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांची यादी तयार करून ती केंद्र सरकारला (Central Government) पाठवण्यास सांगितले आहे. सरकारने आधीच जाहीर केले आहे की, पाकिस्तानी नागरिकांचे सर्व व्हिसा २७ एप्रिल २०२५ पासून रद्द केले जातील, तर वैद्यकीय व्हिसा २९ एप्रिल २०२५ पर्यंत वैध राहतील. याशिवाय भारतीय नागरिकांना शक्य तितक्या लवकर पाकिस्तानातून परतण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. अमित शहांनी सर्व मुख्यमंत्र्यांना या कामाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आणि आपापल्या राज्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे.