दिल्ली | प्रतिनिधी
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकार कठोर कारवाई करत आहे. सिंधू पाणी करार स्थगित करणे आणि अटारी-वाघा सीमा बंद करणे यासारखी पावले पाकिस्तानविरुद्ध उचलण्यात आली आहेत. पंतप्रधान मोदींनी आज लष्करी आणि राजनैतिक पर्यायांवर विचार करण्यासाठी संरक्षण मंत्री आणि सेनाप्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकांमध्ये पाकिस्तानविरुद्ध मोठ्या लष्करी आणि राजनैतिक कारवाईच्या रणनीतींवर चर्चा केली जात आहे, ज्यामुळे दहशतवादाविरुद्ध भारताचे शून्य सहनशीलता धोरण आणखी मजबूत होईल.
भारतीय लष्कराच्या क्षमतेवर आपल्याला पूर्ण विश्वास आहे.दहशतवादाला चिरडून टाकणे हा आमचा राष्ट्रीय संकल्प आहे.दहशतवाद विरोधात कधी कारवाई करायची ते लष्कराने ठरवावे.यासाठी लष्कराला संपूर्ण स्वातंत्र्य असेल,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.