नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामध्ये २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहे. या हल्ल्यामुळे भारतात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असतानाच संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यानंतर भारत सरकार अॅक्शन मोडवर आले असून काश्मीर खोऱ्यात या दहशतवाद्यांचा शोध घेत आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानने सर्जिकल स्ट्राईकची भिती व्यक्त केली असून या घटनेत आपला हात असल्याचा इन्कार करत, स्थानिक बंडखोर संघटनेचे हे कृत्य असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. मंगळवारपासून पाकिस्तानने हवाई दलाला अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश दिले असून हवाई गस्त वाढवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्य दल अलर्ट मोर्डवर गेले असून पाकिस्तानी वायू दलाला सावध आणि अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे पाकिस्तानी वायूदलाची लढाऊ विमाने सध्या भारताच्या सीमेलगत सातत्याने टेहळणी करतना दिसत आहे. भारताकडून बालाकोटप्रमाणे पुन्हा एकदा एअरस्ट्राईक होऊ शकतो. त्यामुळे पाकिस्तानी सैन्यात सध्या चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे सीमारेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून सावध हालचाली सुरु आहेत.
फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइट रडार २४ चे स्क्रीनशॉट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर समोर आले आहेत. स्क्रीनशॉटमध्ये कराची येथील सदर्न एअर कमांडमधून लाहोर आणि रावळपिंडीजवळील उत्तरेकडील तळांवर उड्डाण करणारे पाकिस्तान हवाई दलाचे प्रमुख विमान दाखवण्यात आले आहे.
पाकिस्तानच्या लाहोर, कराची, पेशावर, रावळपिंडी आणि इस्लामाबाद यासारख्या प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय, पाकव्याप्त काश्मीर (POK) मध्ये सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा
दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपला सहभाग नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका टीव्ही चॅनेलशी दूरध्वनीवरून बोलताना म्हटले की, पाकिस्तानचा या हल्ल्याशी काहीही संबंध नाही. पण भारतात असलेल्या अस्वस्थ बंडखोर संघटनांचा हात असल्याचा दावा त्यांनी केला. भारतात बंडखोरांच्या अशा अनेक संघटना आहेत, एक-दोन नव्हे तर डझनभर आहेत. अगदी नागालँडपासून काश्मिरपर्यंत आहेत. दक्षिणेत आहेत, छत्तीसगड, मणिपूरमध्ये आहेत, असे ते म्हणाले.
पाकिस्तानची बाजू मांडताना ख्वाजा आसिफ यांनी अल्पसंख्याकांचा राग आळवला आहे. केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध स्थानिकांचे बंड असून ही लोक आपला हक्क मागत आहेत. मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध या अल्पसंख्याकांचे शोषण करणाऱ्या हिंदुत्ववादी सरकारविरुद्ध बंडखोरी करण्यात आली आहे. भारतात जे काही घडत आहे, त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. त्याचबरोबर आम्ही कोणत्याही परिस्थितीत कुठेही दहशतवादाचे समर्थन करत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
भारताची कसुन शोधमोहीम
तर दुसरीकडे पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी भारतीय सैन्याने सर्वत्र शोधमोहीम हाती घेतली आहे. पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा भारतीय सैन्याकडून कसून शोध घेतला जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या श्रीनगरमध्ये असून ते पहलगामला हल्ला झालेल्या ठिकाणाला भेट देण्यासाठी जाऊ शकतात. तसेच काश्मीर परिसरात कडेकोट लष्करी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. श्रीनगरमध्ये प्रत्येक चौकात लष्कराचे जवान दिसत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा अर्थात एनआयएचे पथक पहलगामला जाणार आहे.
उरी आणि पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यांनंतर भारताने सर्जिकल स्ट्राइक तसेच एअरस्ट्राइक करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले होते. आता पहलगाममध्ये करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याच्या मागे जे कोणी असतील त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल, असे भाराताने म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हीच भूमिका मांडली असल्याने पाकिस्तानला भीतीने घेरले आहे.
त्यातच, भारतीय लष्कर आणि हवाई दलाने जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्था आधीच कडक केली आहे. तर, नियंत्रण रेषेवर ड्रोन आणि हवाई देखरेख टेहळणी वाढवण्यात आली असून सर्व दलांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा