पुणे । प्रतिनिधी
वेदनाशामक, तसेच भुलीसाठी वापरल्या जाणाऱया औषधांचा नशेसाठी वापर करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. बेकायदा औषधांची विक्री करणाऱया एका तरुणीला हडपसर पोलिसांनी अटक केली.
तिच्याकडून एक लाख रुपयांच्या मेफेटरमाईन सल्फेट औषधाच्या (टर्मिन) १६० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. अंबिका उर्फ नेहा आनंदसिंह ठाकूर (वय २६ रा. माळवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. तिच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी हडपसर पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी हडपसर भागात राहणारी अंबिका ठाकूर ही वेदनाशामक तसेच भूल देण्यासाठी वापरल्या जाणाऱया औषधांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेश कवळे यांच्या पथकाने तिला ताब्यात घेतले.