नवी दिल्ली | New Delhi |वृत्तसंस्था
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारतीय सैन्याने (Indian Army) केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान चांगलाच हादरला आहे. अशातच आता ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या लाहोरमध्ये एकापाठोपाठ तीन स्फोट झाले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
आज (गुरुवारी) सकाळी पाकिस्तानमध्ये (Pakistan) स्फोट (Blast) झाल्याचे व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. या स्फोटामुळे बऱ्याच किलोमीटरपर्यंत हादरले बसले आहेत. त्यानंतर सायरनचा आवाज आला. तसेच स्फोटानंतर सर्व नागरिक इकडे तिकडे सैरावैरा पळू लागले. आकाशामध्ये धुराचे लोट पसरले होते, अशी माहिती पाकिस्तानी पोलिसांनी दिली आहे.
तसेच पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार या भागात सुरक्षा दल तैनात आहेत. सामान्य लोकांना जवळ येण्यापासून रोखले जात आहे. या स्फोटांनंतर लाहोरमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आल्याचे समजते. लाहोरच्या गोपाळनगर आणि नसीराबाद परिसरात वाल्टन एअरपोर्टजवळ हे स्फोट झाल्याचे बोलले जात आहे.
तर भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या (Operation Sindoor) कारवाईनंतर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. आतापर्यंत हे स्फोट पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी किंवा लष्कराने क्षेपणास्त्र हल्ले असल्याचे पुष्टी केलेले नाही.
दरम्यान, भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. सर्व सरकारी रुग्णालयांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. देशाच्या हवाई सीमा २४ ते ३६ तासांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. इस्लामाबाद आणि पंजाबमधील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत आणि सुरक्षा दलांना सतर्क ठेवण्यात आले आहे.