नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने (India) कठोर भूमिका घेत पाकिस्तानसोबत असलेला सिंधू पाणी करार (Indus Water Treaty) स्थगित केला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा थयथयाट झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारताचे आरोप नाकारत पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पहलगाम हल्ल्याच्या चौकशीची मागणी केली. तसेच आम्ही कुठल्याही परिस्थितीला सामोरे जायला तयार आहोत, असे म्हणत त्यांनी भारताला पोकळ धमकी दिली आहे.
यावेळी बोलतांना शहबाज शरीफ (Shahbaz Sharif) म्हणाले की, “पाकिस्तानचे पाणी (Pakistan News)कमी करणे किंवा अन्य ठिकाणी वळवण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देऊ. आम्ही कोणत्याही कारवाईस उत्तर देण्यास तयार आहोत. शांतता हीच आमची प्राथमिकता आहे. आम्ही पाकिस्तानच्या अखंडता आणि सुरक्षेच्या बाबतीत कोणतीच तडजोड करणार नाही. पाकिस्तानला शांतता हवी आहे. पण या इच्छेला कमजोरी समजू नये”, असे त्यांनी लष्करप्रमुखांसमोर बोलताना म्हटले.
तसेच “आम्ही पूर्ण तयारनिशी आहोत. त्यामुळे कुणीही काही चूक करू नका. २४० कोटी लोक देशात आहेत. आम्ही आमचे शूर लोक सशस्त्र दलांच्या मागे आहेत. हा संदेश मोठ्याने आणि स्पष्ट असायला हवा. पहलगाममधील अलिकडची दुर्घटना ही या सततच्या आरोप-प्रत्यारोपाच्या खेळाचे आणखी एक उदाहरण आहे, जी आता थांबली पाहिजे. एक जबाबदार देश म्हणून आम्ही आमची भूमिका कायम ठेवतो. असेही पाक पंतप्रधान शरीफ यांनी म्हटले.
दरम्यान, या करारासंदर्भात शुक्रवारी (दि.२५) गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या निवासस्थानी पाण्याचे व्यवस्थापन आणि वापराबाबत बैठक झाली. या बैठकीत परराष्ट्रमंत्री, जलशक्तीमंत्री आणि तिन्ही मंत्रालयांचे सचिव स्तरावरील अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पाकिस्तानला जाणारे पाणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी केंद्रीय जलसंपदामंत्री सी. आर. पाटील यांनी ‘सिंधू पाणी कराराबाबत घेतलेल्या निर्णयाचे पालन केले जाईल. हा निर्णय तीन टप्प्यांत लागू केला जाईल. तत्काळ, मध्यावधी आणि दीर्घकालीन. एक थेंबही पाणी पाकिस्तानात जाऊ नये, यासाठी व्यवस्था केली जाईल. भारताच्या या कारवाईचा परिणाम लवकरच पाकिस्तानवर दिसून येईल, असे म्हटले.
सिंधूतून पाणी नाही तर रक्त वाहणार – बिलावल भुट्टो
सिंधू पाणी करार थांबविण्यात आल्यानंतर पाकिस्तानील (Pakistan) राजकीय नेते बिलावल भुट्टो (Bilawal Bhutto) यांनी भारताला धमकी दिली आहे. ते म्हणाले की, “सिंधू नदीत एकतर पाणी वाहील नाही तर रक्त वाहील. सिंधू खोरे आमचे आहे आणि आमचेच राहील”, असे भुट्टो म्हणाले होते.