जम्मू-काश्मीरमधील पाहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अधिक ताणले गेले आहेत. भारत सरकारने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी कठोर निर्णय घेतला असून, पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश दिले होते.
आज, 27 एप्रिल, हा पाकिस्तानी नागरिकांसाठी भारत सोडण्याचा अंतिम दिवस आहे. मात्र, वैद्यकीय व्हिसा असलेल्या नागरिकांना 29 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सर्व प्रकारचे व्हिसा (दीर्घकालीन, राजनैतिक आणि वैद्यकीय व्हिसा वगळता) 27 एप्रिलपासून रद्द करण्यात आले आहेत.
राज्य सरकारे त्यांच्या भागातील पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेत त्यांना परत पाठवत आहेत. दिल्ली, मुंबई, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हे काम वेगाने सुरू आहे. अमृतसर जिल्ह्यातील अटारी सीमेवर पाकिस्तानी नागरिकांची मोठी गर्दी झाली असून, वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.
दरम्यान, भारतातील अडकलेले भारतीय नागरिकही मोठ्या प्रमाणावर मायदेशी परतत आहेत. गेल्या तीन दिवसांत अटारी-वाघा सीमेवरून 450 हून अधिक भारतीयांनी भारतात प्रवेश केला आहे.
अटारी-वाघा आंतरराष्ट्रीय सीमेवरील आकडेवारीनुसार, 24 एप्रिल रोजी 28 पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानात परतले, तर 105 भारतीय नागरिक भारतात आले. 25 एप्रिलला 191 पाकिस्तानी नागरिकांनी परत प्रवास केला, तर 287 भारतीय भारतात आले. 26 एप्रिल रोजी 75 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडले आणि 335 भारतीय मायदेशी परतले.
अटारी सीमेवर माध्यमांशी संवाद साधताना अनेक पाकिस्तानी नागरिकांनी सांगितले की, ते नातेवाईकांच्या भेटीसाठी किंवा विवाह समारंभासाठी भारतात आले होते. मात्र, आता त्यांना कार्यक्रम अपूर्ण ठेवूनच घरी परतावे लागत आहे.