नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad
नाशिककरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्या पंचवटी एक्स्प्रेसला 11 नवीन डबे मिळाले आहेत. यामधील सीटांची रचना पूर्वीप्रमाणेच समोरसमोर आहे.
मासिक पासधारक व प्रवासी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष राजेश फोकणे, उपाध्यक्ष किरण बोरसे यांनी रेल्वे प्रशासनाशी या डब्यांबाबत पत्रव्यवहार केला होता. पंचवटी एक्स्प्रेसला 2018 पासून एलएचबी अत्याधुनिक असे डबे लावण्यात आले. परंतु, विमानातील सीटप्रमाणे रचना असल्यामुळे या डब्यातील प्रवाशांना चार-पाच तासांच्या नाशिक-मुंबई या प्रवासात पाय सरळ करता येत नव्हते. तसेच मुक्त हालचालीवर मर्यादा आल्या होत्या.
एप्रिल महिन्यात देखभाल करण्याच्या कारणास्तव जवळपास 13 डबे काढून त्याजागी जुने व प्रवाशांना त्रासदायक डबे जोडण्यात आले. याबाबत मासिक पासधारक व प्रवासी वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष राजेश फोकणे यांनी रेल्वे प्रशासनास पत्रव्यवहार करून पंचवटी एक्स्प्रेसला समोरासमोर आसन व्यवस्था असणारे नवीन डबे देण्यात यावे, अशी मागणी केली. याची दखल घेउन प्रशासनाने प्रवाशांना दिलासा दिला आहे. यासाठी उपाध्यक्ष व विभागीय सल्लागार समिती सदस्य किरण बोरसे, सचिव संजय शिंदे, कार्याध्यक्ष कैलास बर्वे, खजिनदार दिपक कोरगावकर, नितीन जगताप, सुदाम शिंदे, रतन गाढवे, संतोष गावंदर, गणेश नागरे, सुनिल केदारे, अॅड. क्रांती गायकवाड, उज्ज्वला कोल्हे आदी पदाधिकार्यांनी प्रयत्न केले.
नवीन डबे लावल्याने मासिक पासधारक व प्रवासी वेल्फेअर असोसिएशनच्या मागणीला यश आले आहे.परंतु स्वतंत्र रेकची (रेल्वेगाडीची) मागणी मात्र अजून अपूर्णच आहे. त्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत.
– राजेश फोकणे