श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda
राज्यात विक्री होणारे पनीर आणि चीज हे कृत्रिम असून अवघे 25 ते 30 टक्के पनीर शुद्ध दुधापासून तयार होते. हे पनीर लोकांच्या जीवाशी खेळ असून यावर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी श्रीगोंद्याचे भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी केली. दरम्यान, तालुक्यातील एका गावातील पनीर बनवण्याच्या कारखान्यातील मुद्देमालच गायब करण्यात आला आहे. अनेक वर्षापासून सुरू असलेल्या कारखान्याबाबतीत अन्न, औषध प्रशासनाच्या अधिकारी यांना विचारणा केली असता, त्यांनी एका प्रकारे कानावर हात ठेवले आहेत.
राज्यात विक्री होणारे कृत्रिम पनीर हानिकारक असल्याचे सांगताना आ. पाचपुते यांनी सभागृहात शुद्ध पनीर आणि कृत्रिम पनीरची पाकिटे झळकावली. व्हजिटेबल फॅट किंवा वनस्पती तूप (पाम तेल) यापासून आर्टिफिशिअल पनीर किंवा फेक पनीर हा शब्द प्रयोग करण्यास शासनाची परवानगी असल्याने या चीजच्या गैरवापरामुळे ग्राहकांची दिशाभूल होते, असे आ. पाचपुते यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात केंद्र शासनाचा ऑनलाईन परवाना मिळवून एनालिसिस, पाम तेल, वेअरमिट पावडर, ग्लिसरॉल मोनो स्टेरीट, मिल्क पावडर व नाममात्र दूध वापरून आरोग्यास हानिकारक असलेल्या बनावट पनीरचा कारखाना अनेक वर्षांपासून सुरू आहे.
याकडे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांना याबाबत माहिती असूनही कारवाई होत नव्हती. मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट डेअरी फार्मच्या नावाखाली पनीरचा कारखाना टाकून विविध प्रकारच्या दुध रिफायनरीच्या मशिनरी नावाला आणून त्याही बंद अवस्थेत आहेत. या ठिकाणी दूधही नावापुरते असून या ठिकाणी दररोज 3 ते 4 हजार किलो बनावट पनीर तयार करून त्याची नाशिक, पुणे, संभाजीनगर, गुजरात, भोपाळ, मध्यप्रदेश, मुंबई, सांगली, सातारा, सोलापूर, संगमनेर येथील हॉटेल व्यावसायिकांना 180- 190 रुपये किलो इतक्या माफक दराने विक्री केली जात होती.
यामध्ये दुध व एनालिसिस हे घटक एकत्र केल्याने या बनावट व भेसळयुक्त पनीरचे सेवन केल्यानंतर कॅन्सर अथवा शारीरिक अपंगत्व येण्याची शक्यता आहे. तसेच भेसळयुक्त पनीरमुळे पोटदुखी, डायरिया, अॅसिडिटी आणि अन्य आरोग्य विषयक समस्या उद्भवू शकतात. हे बनावट पनीर विकून लोकांच्या आयुष्याशी खेळण्याचे काम सुरू आहे. दुध पावडरची सहजपणे भेसळ केली जाते, जी ग्राहकांच्या आरोग्यासाठी हानीकारक आहे. यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील त्या बनावट पनीर कारखान्यांवर अन्न, औषध विभाग काय कारवाई करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
अवघ्या 190 किलोने विक्री
ब्रँडेड कंपनीचे पनीर सुमारे 350 ते 400 रुपये एवढा दर आहे. परंतू भेसळ युक्त पनीर अवघ्या 180 ते 190 रुपये किलो अवघ्या विकत आहे. यामुळे हॉटेल व्यवसायिक यांना स्वस्त दरात पनीर मिळत असल्याने या बनावट पनीरला मागणी वाढली आहे. परंतु पनीरमध्ये रिफाइंड पामोलिन तेल, वेअरमिट पावडर, ग्लिसरॉल मोनो स्टेरीट व नाममात्र दुध या पदार्थांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे भेसळयुक्त पनीर स्वस्तात विक्री केली जात आहे.