लातूर | Latur
माझे बाबा लोकनेते होते. लाखो लोकांच्या प्रार्थना ऐकून तरी मुंडेसाहेब पुन्हा जिवंत होतील, असे वाटले होते. माझी भाबडी आशा होती, वडिलांचा मृत्यू स्वीकारायला खूप दिवस लागले. आयुष्यात काय करायचे हे त्यांनी मला कधीच शिकवले नाही, काय करायचे नाही हे त्यांनी शिकवले, असे भावुक सुरात सांगतच ‘कहाँ तुम चले गये?’ म्हणत वडिलांच्या आठवणीत पंकजा मुंडे भावूक झाल्या.
लातूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. यासोबतच मंत्री पंकजा मुंडे, मंत्री जयकुमार गोरे, लातुरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले, नेते संभाजी पाटील निलंगेकर, विविध आमदार आणि खासदार, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात गोपीनाथ मुंडे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना मला बरेचजण सांगतात की माझी कार्यपद्धती ही गोपीनाथ मुंडे यांच्यासारखी नाही. मी ते मान्य करते. कारण माझी काम करण्याची पद्धत ही माझ्या वडिलांना जशी हवी होती, तशीच आहे.
माझ्या वडिलांनी त्यांच्या तोंडातून सांगितले की मी त्यांची वारस आहे. त्यामुळे त्या वारशाला सुईच्या टोकाइतकाही धक्का लागू देणार नाही असे पंकजा मुंडे म्हणाल्या. मुंडे साहेबांच्या वारशासोबत संघर्ष आला, अडचणी आल्या. परंतु आम्ही संस्कारात वागलो, कुणाबद्दलही वाईट विचार केला नाही असे त्या म्हणाल्या.
फेकलेले तुकडे कधीच स्विकारायचे नाही
स्वाभिमान कधीही गहाण ठेवायचा नाही. फेकलेले तुकडे कधीच स्वीकारायचे नाहीत, असे मला मुंडे साहेबांनी नेहमी सांगितले. त्यांनी मला कायम स्वाभिमान शिकवला. तसेच क्षमा करणे मोठी गोष्ट आहे. त्यामुळे कुणी चुकले आणि माफी मागितली तर क्षमा केली पाहिजे, अशी लाखमोलाची गोष्ट त्यांनी मला सांगितली. बेरजेचे राजकारण हे मुंडेसाहेबांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य राहिले. देवेंद्र फडणवीस हेच वैशिष्ट्ये पुढे घेऊन जात आहेत, असे पंकजा मुंडे म्हणाले.
माझी कार्यपध्दती मुंडेंसारखी नाही पण त्यांना अपेक्षित
पंकजा मुंडे म्हणाल्या की, “माझी कार्यपद्धती ही मुंडे साहेबांच्या सारखी नाही असे अनेकजण म्हणतात. होय, माझी कार्यपद्धतीन ही त्यांच्यासारखी नाही, पण त्यांना अपेक्षित अशीच आहे. तुला गोपीनाथ मुंडे व्हायचे आहे, पण सुधारित आवृत्ती व्हायची आहे असे मुंडे साहेबांनी मला सांगितले होते. त्यामुळे कधीही स्वाभिमान गहाळ न ठेवता राजकारण करण्याचे वचन मी माझ्या वडिलांना दिले. त्याच्याशी कधीही प्रतारणा करणार नाही.”
दोन्ही नेते प्रांजळ राकारणाचे मूर्तीमंत उदाहरण
तसेच गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याच्या बाजूलाच स्वर्गीय विलासराव देशमुख यांचाही पुतळा आहे. या दोन्ही नेत्यांनी प्रांजळ राकारणाचं मूर्तीमंत उदाहरण या जोडीने उभं केलेलं आहे. या दोन्ही नेत्यांत मैत्री होती. पण त्यांनी एकमेकांच्या पक्षांशी कधीच प्रतारणा केली नाही. ते दोघेही एकमेकांच्या विरोधात लढले. मी पालकमंत्री असताना विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण मी पालकमंत्री असताना झाले, अशीही आठवण यावेळी पंकजा मुंडे यांनी सांगितली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





