Saturday, January 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPankaja Munde PA Anant Garje : डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्येप्रकरणी मुंडेंचा PA...

Pankaja Munde PA Anant Garje : डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्येप्रकरणी मुंडेंचा PA अनंत गर्जेला अटक

पोलीस चौकशीत समोर आली मोठी माहिती

मुंबई | Mumbai

राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे स्वीय सहायक (PA) अनंत गर्जे (Anant Garje) यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे (Gauri Palve) यांनी वरळीच्या बीडीडी वसाहतीतील घरी गळफास घेऊन शनिवारी आत्महत्या केली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर अनंत गर्जे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर अनंत हा फरार होता.त्यानंतर आता अनंत गर्जे यास अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, काल (रविवारी) १ वाजता अनंत गर्जे यांनी वरळी पोलिसांसमोर (Worli Police) आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. पत्नी गौरी गर्जेचा शारीरिक, मानसिक छळ करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अनंत गर्जेसह नणंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जेवर वरळी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

YouTube video player

आत्महत्येच्या आधी गौरी आणि अनंत यांचे कडाक्याचे भांडण

अनंत गर्जे यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत आत्महत्येच्या काही मिनिटापूर्वीच दोघांचे कडाक्याचे भांडण झाले होते. यानंतर अनंत गर्जे हे पंकजा मुंडे यांच्या कार्यक्रमानिमित्त घराबाहेर पडले होते. अनंत गर्जे यांची गाडी कोस्टल रोडला असताना गर्जे वारंवार गौरी यांना फोन करत होते मात्र गौरी यांनी फोन उचलला नाही. याच संशयातून अनंत यांनी गाडी पुन्हा घराकडे वळवली. घराबाहेरून आवाज देऊनही गौरी दार उघडत नव्हती. आतून कुठलीही प्रतिक्रिया मिळत नसल्याने अनंत यांनी खिडकीतून घरात डोकावले. यावेळी गौरी यांनी गळफास घेतल्याचे त्यांना दिसून आले, अशी माहिती समोर आली आहे.

मंत्री पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

या प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी माध्यमांसाठी प्रेस नोट काढली आहे. त्यात त्या म्हणतात दिनांक २२ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६.३० ते ६.४५ वाजेच्या सुमारास माझा पीए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवर आला. तो खूप रडत होता. पत्नीने आत्महत्या केल्याचे अत्यंत आक्रोशाने त्याने मला सांगितले. ही गोष्ट माझ्यासाठी ही खुप धक्कादायक होती. पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये व त्यांनी योग्य तपास करुन या विषयाला हाताळावे असे माझे म्हणणे आहे, तसे मी पोलिसांना देखील सांगितले आहे. गौरीच्या वडीलांशीही मी बोलले, ते प्रचंड दु:खात आहेत हे मी समजू शकते. अश्या घटना जीवाला चटका लावून जातात आणि मनाला सुन्न करतात. कोणाच्या अति वैयक्तिक जीवनात काय चालू असतं हे अनाकलनीय आहे. अचानक धक्कादायक अशी ही घटना घडली असल्याने मलाही अस्वस्थ वाटत आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

काय आहे प्रकरण?

गौरी गर्जे आणि अनंत गर्जे यांचा नऊ महिन्यांपूर्वीच थाटात विवाह पार पडला होता. मात्र, शनिवारी राहत्या घरात गौरीने गळफास लावून आत्महत्या केली. पतीच्या अनैतिक संबंधातून सुरू असलेल्या वादातून तिचा बळी गेल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. गौरी गर्जे आत्महत्येपूर्वी अनंतच्या आधीच्या पत्नीचे गर्भवती असल्याची कागदपत्रे मिळाल्याने ती अस्वस्थ होती. ती कागदपत्रे तिने आम्हाला पाठवली होती, असा जबाब गौरीच्या वडिलांनी नोंदवला होता. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अनंत गर्जे यांच्यासह वरळी पोलीस ठाण्यात तिघांवर बीएनएस कलम १०८,८५, ३५२,३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मूळची बीडची रहिवासी असलेली गौरी हिचे वडील अशोक पालवे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. ते वैद्यकीय योग शिक्षक आहेत तर आई परिचारिका म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : अस्तित्वाच्या संघर्षात छोटे पक्ष घायाळ

0
नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व यश मिळविल्याने अनेक छोट्या पक्षांचे अस्तित्वच पुसले गेले आहे. केवळ छोटेच नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीसारख्या तुलनेने मोठ्या...