बीड | Beed
येथील ऐतिहासिक भगवानगडावर मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा दसरा मेळावा (Dasara Melava) पार पडला. यावेळी त्यांनी जातीपातीच्या भिंती मोडून काढण्याचे आवाहन करत आणि सामाजिक बांधिलकी जपताना जालन्यातील ‘अंतरवली’ सराटी हे गाव दत्तक घेत असल्याची घोषणा केली. तसेच हे सीमोल्लंघनाचं दशक आहे. दुष्काळ आहे म्हणून काय झालं, माझे सगळे वाघ उन्हातले, डोंगरातले आहेत, या वाघांना ऊन लागत नाही!” अशा शब्दांत मुंडे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.
यावेळी मुंडे म्हणाल्या की, “एखाद्या कुत्र्याला दगड मारला तर तो केकाटत जाईल, पण मधाच्या पोळ्याला दगड मारला तर काय होतं, हे सगळ्यांना माहीत आहे. हे माझं मधाचं पोळं आहे. मधमाशा जशा कष्ट करून मध गोळा करतात, तशी माझी लेकरं कष्ट करतात” असे म्हटले. तसेच गोपीनाथ मुंडेंची आठवण काढत त्यांनी, गोपीनाथ मुंडे परिवार तुमचे उपकार कधीही विसरू शकत नाही, अशी भावनिक साद घातली.
जाती-धर्माच्या भिंती मोडून काढण्याची हाक
दुष्काळी (Drought) परिस्थितीवर भाष्य करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, “दुष्काळ गरीब-श्रीमंत पाहत नाही, तहान कोणालाही वेगळी लागत नाही. संकट येतं तेव्हा जातीच्या भिंती टिकत नाहीत. आपल्याला माणसा-माणसात भिंत उभी करायची नाही, तर धर्माच्या आणि जातीच्या भिंती मनगटाने मोडून काढायच्या आहेत. जे नेते जातीपातीच्या जीवावर राजकारण करतात, त्यांना भविष्य नाही”, असेही त्यांनी सांगितले.
जालन्यातील ‘अंतरवली सराटी गाव दत्तक!
समाजात सलोखा राखण्याच्या भूमिकेतून त्यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा करताना सांगितले, “मी जालन्यातील ‘अंतरवली सराटी’ गाव दत्तक घेत आहे. अंतरवलीचा विकास करणार आहे आणि माझ्या बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक गावाइतकं प्रेम तिथे देणार आहे, असे मुंडे म्हणाल्या.
जेन झी तरुण पिढी आणि देशभक्तीचा संदेश
आजच्या तरुण पिढीबद्दल (Gen Z) बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “आज परदेशात काय चाललंय ते तुम्ही रिल्सवर पाहता. मात्र, आपल्या देशामध्ये आपल्याला अशी तरुण पिढी नको, जिच्या मनात देशाबद्दल आदर नाही. जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून आणि गोपीनाथ मुंडेंसारख्या नेत्यांच्या विचारातून देशभक्तीचे टॉनिक भिनवलेले सैनिक आपल्याला घडवायचे आहेत”, असे त्यांनी म्हटले. तसेच “लग चुकी है जीत की, खुद को आग में झोक देते हैं…” असा शेर म्हणत त्यांनी कुठलाही पुढचा विचार न करता क्षणात भगवान भक्तीगड स्थापन केल्याची आठवण करून दिली आणि लेकीच्या शक्तीची जाणीव करून दिली.




