Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रमाझ्या घरातील सगळ्या माणसांना फोडू नका

माझ्या घरातील सगळ्या माणसांना फोडू नका

मुंबई –

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर यावेळी राजकीय टोलेबाजी रंगलेली पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

लवकरच प्रदर्शित होणार्‍या एका एपिसोडमध्ये राजकीय हास्यकारंजे उडताना दिसणार आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजप खासदार सुजय विखे पाटील, शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार हे महाराष्ट्रातील युवा चेहरे ‘चला हवा येऊ द्या’ मंचावर दिसणार आहेत.

कार्यक्रमातील ‘थुकरटवाडी’त नेहमीच हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांची रेलचेल असते. पण यावेळी खुद्द एकमेकांच्या विरोधात असणार्‍या राजकीय मंडळींची हजेरी या कार्यक्रमात पाहायला मिळाली. भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी चला हवा येऊ द्याच्या मंचावर हजेरी लावली.

कार्यक्रमात पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवे आणि सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री देखील सहभागी झाल्या होत्या. नेहमीसारखीच हास्याची धमाल या कार्यक्रमात पाहायला मिळाली. सोबतच राजकीय टोलेबाजीही रंगलेली पाहायला मिळली. त्याचे झाले असे की, कार्यक्रमात सहभागी झालेल्या झोडप्यांमध्ये एक खेळ खेळण्यात आला. रिंग टाकून वस्तू जिंकण्याचा हा खेळ होता. त्यात अगदी चलाखीने घड्याळाचा देखील समावेश करण्यात आला होता. त्यात मोठा योगायोग असा की, पंकजा यांचे पती आणि सुजय विखे यांच्या पत्नी यांनी टाकलेली रिंग थेट घडाळ्यावर पडली. त्यानंतर तुम्ही माझ्या घरातील सगळ्या व्यक्तींना नका हो फोडू, असा टोला पंकजा यांनी रोहित पवारांना लगावला.

राजकारणात घड्याळ म्हटले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह लक्षात येते. अशात खेळामध्ये योगायोगाने घड्याळावर पडलेल्या रिंगमुळे पंकजा यांनी रोहित पवारांना टोला लगावला. सुजय यांची पत्नी आणि माझा नवरा यांना फोडण्याचे काम रोहित करत असल्याची मिश्किल टिप्पणी पंकजा यांनी यावेळी केली. त्यामुळे राष्ट्रवादीत असलेले बंधू धनंजय मुंडे यांच्याकडे पंकजा यांचा रोख होता, असे समजले तर काही वावगे ठरणार नाही. तर पंकजा यांच्या टोमण्यावर रोहित पवार यांनी देखील चोख उत्तर दिले, घरच्यांना माहित असते आपल्या माणसांसाठी काय चांगले आहे, असे मजेशीर उत्तर रोहित यांनी दिले आणि मंचावर एकच हशा पिकला.

- Advertisment -

ताज्या बातम्या