झरेकाठी |वार्ताहर| Zarekathi
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील हजारवाडी परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, शुक्रवारी (दि.16) एकाच रात्री दोन बंद घरे फोडून साडेपाच तोळे सोन्याचे दागिने आणि 70 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पानोडी शिवारातील हजारवाडी येथील कोळेकर वस्तीवर हा प्रकार घडला. चोरट्यांनी सुरुवातीला अनिल देवराम कोळेकर (वय 30, रा. हजारवाडी, पानोडी) यांच्या बंद घराला लक्ष्य केले. घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील पत्र्याच्या पेटीचे आणि कपाटाचे लॉक तोडून चोरट्यांनी अडीच तोळे सोन्याचे दागिने आणि 20 हजार रुपयांची रोकड लंपास केली. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा शेजारीच राहणारे कारभारी कृष्णा कोळेकर यांच्या घराकडे वळवला. त्यांच्याही घराचे कुलूप तोडून कपाटातील 50 हजार रुपयांची रोकड आणि तीन तोळे सोन्याचे दागिने असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. शनिवारी सकाळी 7:15 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
या घटनेत चोरट्यांनी एकूण 2 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला आहे. यामध्ये 3 ग्रॅमची सोन्याची साखळी व वाटी, 7 ग्रॅमचे सोन्याचे मणी आणि 5 ग्रॅमची सोन्याची अंगठी, सोन्याचे झुबे, राजकोट रिंगा, नथ, पळी आणि सोन्याचा सर, रोख 70 हजार रुपये (अनिल कोळेकर यांचे 20 हजार व कारभारी कोळेकर यांचे 50 हजार) याचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच पानोडीचे सरपंच गणपत हजारे, भारत शेवाळे यांच्यासह ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांनी कर्मचार्यांसह घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. अनिल कोळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार ए. डी. शिंदे हे करत आहे.




