ऐन उन्हाळ्यात बघायला मिळणारे अवकाळीचे थैमान प्रश्न गंभीर करते हे खरे. पण निसर्ग असा तांडव का करतो? मुळात निसर्ग अतिशय संयमी आहे. पराकोटीचा सहनशील आहे, कारण तोच निर्माता आहे. विलय हे अंतिम सत्य असले तरी त्या अखेरच्या क्षणापूर्वी प्रत्येक जीवाला जगण्याचा उदंड आणि सर्वतोपरी आनंद देणे हाच त्याचा स्वभाव आहे. त्यानुसारच तो तप्त वातावरण सुसह्य करण्यासाठी वसंताचा राग आळवतो आणि ऋतू फुलतो.
प्रत्येक ऋतूची वेगळी गंमत असते, वेगळी ओळख असते. त्यात वसंताची महती तर काय वर्णावी! खरोखर हा ऋतुराज आहे. गंधभारीत आहे. याकाळात वातावरणात उष्म्याचा प्रकोप असला तरी वसंतातील रम्यता तो दाह सहन करण्याची शक्ती प्रदान करते. चहुबाजूंनी रंग-गंध आणि नादमधूर कुजनाचा होणारा वर्षाव आपल्या वृत्ती प्रसन्न करण्यास मदत करतो. पहाटेपासूनच कोकिळेचे मंजूळ स्वर वातावरणातील नादमाधुर्य वाढवू लागतात. अंगोपांगी बहरलेले वृक्ष उन्हाच्या कहरातही अस्तित्व टिकवून ठेवण्याबरोबर सौंदर्याचा गाभा जपण्याची शिकवण देऊन जातात. उन्हाने तापलेल्या जमिनीवर पाण्याचे दोन थेंब पडताच पसरणारा मृदगंध काहिली शमवतो, त्याचप्रकारे रंगांची उधळण करणार्या वेली, वृक्ष आपली दृष्टी निववितात.
बहरात असलेली वसंताची पावले पडतात ती होळीपासूनच. कुठे सोनमोहराचा भारदस्त पिवळा जर्द फुलोरा खुणावतो तर कुठे शांत नीलमोहर निळ्या-जांभळ्या फुलांची पखरण करत असलेला दिसतो. उनाड वार्याची झुळूक फुलांचा गालिचा उधळून लावते. कुठे शिवरीच्या शेंगा फोडून उडालेला कापूस मांजा कापलेल्या पतंगासारखा उडत राहतो. फुललेल्या गुलमोहरावर अचानक एखादा कोकीळ सप्तकातील तान घेतो. सोनचाफ्याच्या नाजूक हिरव्या पानाआडच्या फांदीवर भारद्वाजाची जोडी अलगद उतरते. रस्त्याच्या लगत एखादा पांगारा आपल्या तांबड्या फुलांचा साज सावरत डवरलेला असतो. मधूनच भुर्रकन एखादा फुलचुरव्या येतो आणि फुलात शिरून मकरंद शोषून घेत आला तसाच उडून जातो.
हे अनोखे वृक्षगान सातवाहनाने संपादित केलेल्या ‘गाथा सप्तशती’ या ग्रंथामध्ये ठायी ठायी आढळते. इसवी सन पूर्व 100 च्या आसपास तयार केलेला हा महान प्राकृत ग्रंथ, तत्कालीन निसर्गसंपदेचे, ऋतुवैभवाचे आणि त्याभोवती रुंजी घालणार्या जनजीवनाचे रेखाचित्र डोळ्यासमोर उभे करून जातो.
पांगार्याची गळून पडलेली फुले कधी नीट निरखलीत तर खरेचच वंदन करण्यासाठी झुकल्यासारखी दिसतात.
रक्तवर्णी फुलांनी बहरलेला पळस असा भासतोय
जणू त्रिगर्तांच्या बाणांनी
विद्ध धनंजय जखमा मिरवत हसतोय।
इसवी सन पूर्व 100 मध्ये एखाद्या सामान्य कवीने रचलेली ही असामान्य गाथाही त्याचे ज्ञान आणि प्रतिभेचे समर्थ दर्शन घडवून जाते. भारतीय संस्कृतीतील या ग्रंथाचा संदर्भ पुढे कालिदासासह सर्वांनी वापरला आहे. कवी कुलगुरू कालिदासाच्या ‘ऋतुसंहार’मध्ये हा ऋतुराज वसंत आपल्या वैभवाचे प्रदर्शन करतो. यावेळी कालिदास म्हणतात,
रम्य संध्याकाळ नितळ चंद्रकिरण
कोकिळेचे कूजन सुगंधित पवन
मत्त भ्रमरांचे गुंजन रात्रीचे नवरसांचे पान
मदनाचे जणू अमृत रसायन
तसे पाहता सुरांची वेगळी भाषा असते तसेच सुगंधालाही एक भाषा असते. आता मोगर्याचेच बघा ना…एखादी प्रौढा लगतच्या दोन हिरव्यागार पानांसह मोगर्याची दोन टपोरी फुले केसात घालते तेव्हा तो समजूतदार वाटतो. तीच फुले प्रियकराच्या हातातील छानशा गजर्यात माळून प्रियेच्या केसावर विसावतात तेव्हा त्यावर प्रणयाची धुंदी चढल्यासारखी वाटते. पण हाच मोगरा देवपूजेतल्या तबकात सजतो तेव्हा मांगल्याचे प्रतीक होऊन जातो.
स्थळानुसार संदर्भ बदलणारी ही फुलांची भाषा! वसंतात तर सुगंधाच्या लाटांवर लाटा येत असतात. वार्यावर आरूढ झालेल्या या लाटा हृदयाच्या किनार्यावर धडकतात आणि आनंदाचे मळे फुलवून जातात. या फुलांची आणखी एक गंमत आहे. प्रत्येकाची जागा नेमकी ठरलेली. म्हणजे मोगर्यासारखे ऑलराऊंडर थोडेच. बाकी प्रत्येकजण आपापल्या जागी समाधानी.
याकाळात पांगारा, बहावा, सोनमोहर, गुलमोहर, गुलबक्षी, सदाफुली, बोगनवेल, कैलासपती, मदनबाण अशी असंख्य फुले कितीही सुंदर आणि सुगंधी असली तरी सृष्टीचा गाभाराच सजवतात. चाफा, प्राजक्त, अबोली, चमेली, कुंद, कागडा, कृष्णकमळ, अनंत, तगर, जास्वंद ही खास देवघरातील फुले. त्यात विशेष प्रसंगी झेंडू, शेवंती, गुलाब आदी फुले पाहुणी म्हणून येतात. झेंडू, शेवंतीसारखी शोभा हारातही जास्त खुलते. गुलाब शुभेच्छांसवे हाती येतो तेव्हाही जास्त भावतो. कमळ, ब्रह्मकमळ यांसारख्या फुलांचा दिमाखच काही वेगळा. अगदी खास प्रसंगीच त्याचे दर्शन होणार. मधुमालती, रातराणी, बोगनवेल पानोपानी फुलते. ती कधी घराचा उंबरा ओलांडण्याच्या फंदात पडत नाहीत. रानोमाळ बहरणारी अशी ज्ञात-अज्ञात फुले आपल्याच मस्तीत फुलत असतात. कोणी पाहो अथवा न पाहो, सृजनाचा उत्सव रंगत असतो.
निसर्गाचा हा कॅनव्हास आपल्याच मस्तीत धुंद असणार्या एखाद्या कलाकाराने रेखलेल्या आडव्या तिडव्या फटकार्यांसारखा मनस्वी असतो. एखाद्या चित्रकाराने रेखलेले सुंदर चित्र चांगली किंमत मिळवत असेल कदाचित, पण कलंदर चित्रकाराने दिलखुलास फटकारे मारलेला कॅनव्हास गॅलरीचे आकर्षण ठरतो तसेच काहीसे आहे हे! त्यात आणखी छटा मिसळत जातात त्या कवडशांच्या… दाट पानांचा गुंता सोडवत काही चुकार किरणे जमिनीपर्यंत पोहोचतात आणि सुरेखशी नक्षी घालतात. पाने हलली की पायतळीच्या नक्षीचे कोलाजही हलते. एखादा धीरगंभीर वृक्ष राक्षसी सूर्यकिरणांना थोपवून धरत पशुपक्ष्यांवर गर्द छाया धरतो. मधूनच येणारी हलकीशी झुळूक भुंग्यांनी पोखरलेल्या वेळूच्या बनातून वेणूचे सप्तसूर छेडून जाते. ऊन खात निपचीत पडलेल्या निसर्गदेवतेला कोकीळेचे साद जागे ठेवतात. पाखरांचा चिवचिवाट कोरसमध्ये गात राहतो आणि पानोपानी वसंत फुलत राहतो.