भविष्यात जलवायू परिवर्तन आणि जागतिक तापमानवाढीचे चटके वाढणार आहेत. शहरी लोकसंख्येत वाढ होऊन प्रतिव्यक्ती उपलब्ध मोकळी जागा कमी होत जाणार आहे. अशावेळी ‘शहराची फुफ्फुसे’ म्हणून ओळखल्या जाणार्या बागांचे आणि सार्वजनिक उद्यानांचे स्वरूप कसे असेल? अशावेळी आधुनिक, स्मार्ट बागा तयार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपयोगी पडणार आहे.
कॉक्रिटच्या जंगलातून बाहेर पडून झाडाझुडपांमध्ये मन रमवणे ही माणसाची गरज आहे. प्रदूषणाने ग्रासलेल्या शहरांमध्ये बागबगीचे फुफ्फुसाचे काम करतात. सार्वजनिक बागा केवळ मनोरंजन किंवा सजावटीचे साधन नसून पर्यावरणीय समतोल, ऊर्जा संरक्षण, जलसंग्रहण आणि अन्य अनेक कारणांसाठी आवश्यक ठरतात. परंतु वाढत्या शहरीकरणाच्या आणि जागतिक तापमानवाढीच्या सध्याच्या दिवसांत बागांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. भविष्यात मोठी शहरे आणखी मोठी होतील. जगाची सर्वाधिक लोकसंख्या शहरांमध्येच एकवटेल. म्हणजे, अर्थातच सध्या आहेत त्याहून अधिक बागा शहरांत असणे गरजेचे ठरेल. शहरांचा आकार आणि लोकसंख्या यांचे प्रमाण लक्षात घेता आपल्याकडे प्रतिव्यक्ती अत्यंत कमी मोकळी जागा आहे. अशा परिस्थितीत शहरांचे नियोजन करताना नव्याने मुळापासून विचार केला पाहिजे. कारण जगभरात या विषयावर केवळ विचारच नव्हे तर प्रत्यक्ष कृतीही सुरू झाली आहे. आता भविष्यातील उद्याने कशी असतील? त्यांचे रंगरूपच नव्हे तर संपूर्ण स्वरूपच बदललेले असेल. या उद्यानांमध्ये मटेरियल सायन्स, डिझाईनिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज, सायबरनेटिक्स, सेन्सर अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला असेल. उद्यानांची निर्मिती आणि त्यांची देखभाल यासाठी शास्त्रज्ञ नवे तंत्रज्ञान आणि नव्या प्रणालींचा वापर करण्यास उत्सुक आहेत. त्याचप्रमाणे उद्यानांसाठी नव्या जागा आणि नवे वातावरण याचाही शोध घेतला जात आहे. भविष्यात जमिनीच्या खाली, जलाशयाच्या तळाशी, एखाद्या बोगद्यात किंवा वाहत्या पाण्याच्या पृष्ठभागावर बगीचे दिसल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण, पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते आणखी दोन वर्षांनी जगातील कार्बन उत्सर्जन एवढे वाढलेले असेल की, तेथून परतीचा मार्ग नसेल. वातावरण पूर्ववत करणे जवळजवळ अशक्य बनलेले असेल. अशावेळी आपल्याला बागा आणि उद्यानांची खरी किंमत कळेल. जलवायू परिवर्तन आणि अन्य पर्यावरणीय संकटांपासून बचावासाठी अशा बागांचा आणि उद्यानांचाच आपल्याला एकमेव आधार असेल.
भविष्यातील बागा आणि उद्याने कशाप्रकारे विकसित करायला हवीत, यादिशेने शास्त्रज्ञ सध्या गांभीर्याने विचार करत आहेत. शास्त्रज्ञांना असे बगीचे फुलवायचे आहेत, जे केवळ पर्यावरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीनेच नव्हे तर अन्नपुरवठा आणि ऊर्जा क्षेत्राच्या दृष्टीनेही फायदेशीर असतील. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा वापर करता येईल, हा सध्या अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय बनला आहे.
सर्वप्रथम शास्त्रज्ञांना बगीचासाठी बाह्यस्रोतांवरील अवलंबित्व कमीत कमी ठेवण्यावर प्रयत्न करायचा आहे. कोणत्याही झाडाला उगवण आणि वाढीसाठी पाणी, हवा, पाऊस, जमीन आणि अनेक मानवनिर्मित घटकांची गरज भासते. अर्थातच, झाडांच्या विकासासाठी आवश्यक असणारे नैसर्गिक घटक वजा करता येत नाहीत. परंतु ते कमीत कमी असावेत आणि त्यांच्यावरील अवलंबित्व कमीत कमी असावे, यादिशेने प्रयत्न सुरू आहेत. त्याप्रमाणेच रोपांसह बागेतील सर्व घटकांमध्ये कनेक्टिव्हिटी आणण्याचाही शास्त्रज्ञांचा प्रयत्न राहील. ही कनेक्टिव्हिटी बगीचांची सुरक्षितता, वाढ आणि देखभालीच्या दृष्टीने आवश्यक आहे. केवळ उपकरणेच नव्हे तर अन्य भौतिक वस्तूही ज्याच्या माध्यमातून एकमेकांशी जोडता येतात, अशा इंटरनेट ऑफ थिंग्ज या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने डाटा आणि अन्य माहिती संकलित करणे, त्याचप्रमाणे सॉफ्टवेअर आणि नेटवर्क कनेक्टिव्हिटी, सेन्सर आदींच्या एकत्रिकरणातून नैसर्गिक स्वरुपात तयार केलेल्या बागेच्या किंवा सार्वजनिक उद्यानाच्या आणि त्यातील विविध भागांच्या संदर्भातील माहिती एकमेकांशी जोडली जाईल.
या नव्या संमिश्र तंत्रज्ञानातून आपल्याला कळू शकेल की कोणते रोपटे चांगल्या प्रकारे वाढत आहे आणि कोणत्या रोपट्याची वाढ खुरटते आहे. एखादे रोपटे रोगाचे बळी ठरत असेल तरी ते आपल्याला कळू शकेल आणि त्या आजाराचे कारणही समजेल. वातावरणाचे तापमान किती आहे, हवेतील आर्द्रता रोपांच्या दृष्टीने पुरेशी आहे की नाही, याचीही वेळोवेळी माहिती मिळू शकेल. जमिनीची गुणवत्ता कमी आहे की जास्त आहे किंवा एखाद्या रोपट्याला वाढीच्या दृष्टीने संबंधित जमीन पोषक आहे की नाही, याचाही अंदाज आपल्याला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घेता येईल. हवा आणि पाण्यापासून आपले अन्न तयार करण्यात रोपे सक्षम आहेत का, हेही समजू शकेल. संबंधित सॉफ्टवेअरमध्ये सुमारे लाखभर वनस्पती, त्यांची पाने, फुले, रंग आणि रोपांचा क्रमिक विकास यासंदर्भातील आकडेवारी भरली जाईल. या आकडेवारीच्या आधारे रोपट्यांची देखभाल केली जाईल. खतपाणी आणि उजेडाची कमतरता असल्यास किंवा हे घटक अधिक होत असल्यास आपल्याला हे सॉफ्टवेअरच माहिती देईल. बगीच्यात करण्यात आलेली प्रकाशयोजना अशा प्रकारच्या उपकरणांनी तयार केलेली असेल की दिवसा पुरेसा प्रकाश रोपांना मिळत नसेल तर रात्री प्रकाश देऊन ती कमतरता भरून काढली जाईल. कोणत्या रोपट्याला अधिक पाणी पाहिजे, कोणत्या रोपाला अधिक प्रकाश हवा आहे, पाण्याची बचत कशी करता येईल, या सार्या माहितीचा संचय करता येईल आणि एक स्मार्ट उद्यान विकसित करता येईल. अशा स्मार्ट उद्यानात 50 टक्के पाण्याची बचत होईल. खतपाणी केव्हा घालायचे, याची माहिती मेलवरून मिळेल. कोणती परिस्थिती उद्यानातील कर्मचारी हाताळू शकतील आणि कोणत्या परिस्थितीसाठी तज्ज्ञाला बोलवायला हवे, हेही सॉफ्टवेअरच आपल्याला सांगेल.
सार्वजनिक उद्यानाकडून दिल्या जाणार्या सेवासुविधा, कामकाज आणि व्यवस्थापनातही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. म्हणजेच बागबगीच्यासाठी केवळ माळी असणे पुरेसे ठरणार नाही तर मॅनेजर, डिझाईनर, वनस्पतीतज्ज्ञ आणि पार्क टेक्नॉलॉजिस्टचीही आवश्यकता असेल. हे तंत्रज्ञ आपापल्या क्षेत्रातील व्यवस्थापन सांभाळतील आणि परस्परांमध्ये ताळमेळ राखतील. बागेच्या सर्व गरजांकडे लक्ष पुरवतील. बगीचा तयार करणार्यांना अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ कसा देता येईल, याची ही मंडळी काळजी घेतील. बागेमध्ये मनोरंजनाचे ठिकाण, पिकनिकचे ठिकाण कुठे असेल, समारंभांसाठीची जागा कुठे असेल, लोकांना विविध सुविधा देणारा कक्ष तसेच लहान मुलांना खेळण्यासाठीची जागा कुठे असेल, हे सर्व निश्चित करण्यासाठी सॉफ्टवेअरद्वारे मिळवलेल्या आकडेवारीचा आधार घेतला जाईल. अशा अत्याधुनिक बगीचांमध्ये एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी लोकांना नेण्यासाठी पर्यावरणपूरक आणि चालकविरहित वाहने असतील. बागेतील बाकड्यांवर बसल्या-बसल्या लोक आपले मोबाईल फोन आणि लॅपटॉप चार्ज करू शकतील. अशा अनेक सुविधांनी युक्त या नव्या बागांचे सर्वांनाच आकर्षण असेल.
एकीकडे अशाप्रकारे सर्व सुविधांनी युक्त अत्याधुनिक बागबगीच्यांची चर्चा आणि त्यावर काम सुरू आहे, तर दुसरीकडे ‘फॉरेस्ट गार्डनिंग’ची संकल्पनाही मूळ धरत आहे. या प्रकारच्या उद्यानांचे व्यवस्थापन आणि स्वरूप अगदी जंगलाचे असते तसेच असेल. तसे पाहायला गेल्यास ‘फॉरेस्ट गार्डनिंग’ ही संकल्पना खूप जुनी आहे आणि आजकाल ऑस्ट्रेलियासह काही देशांमध्ये ती अंमलातही आणली जात आहे. जंगली बागेतील झाडांना ना पाणी द्यायचे आहे ना खत, ना खड्डे खणायचे आहेत ना गवत कापायचे आहे. हा बगीचा सेंद्रीय पद्धतीने विकसित केलेला आणि वन्यजीवनास पोषक असतो. तसेच झाडांना होणार्या विविध आजारांपासून तो मुक्त असतो. तेथे जाऊन मनमुराद खाण्यापिण्याचा खर्चही कमी असेल. विशेष म्हणजे फॉरेस्ट गार्डनिंग या संकल्पनेवर आधारित बगीचा आपल्या गच्चीवर किंवा घराच्या परसदारीही तयार केला जाऊ शकतो. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड घेऊन फॉरेस्ट गार्डनिंग तसेच शहरी बागा आपल्यासमोर काही वर्षांतच नव्या स्वरुपात येतील हे मात्र खरे.