नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज संसदेत वंदे मातरमला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चर्चा पार पडली. वंदे मातरमवरील चर्चा करण्याचे मुख्य कारण म्हणजे बंगालची निवडणूक येत आहे. ज्यांनी स्वातंत्र्याची लढाई लढली आणि देशासाठी कुर्बान्या दिल्या, त्यांच्यावर नवीन आरोप लादण्याची संधी सरकारला हवी आहे. असे म्हणत काँग्रेसच्या वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचा समाचार घेतला.
प्रियांका म्हणाल्या की, सरकार वर्तमान आणि भविष्याकडे पाहू इच्छित नाही, म्हणून ते पुन्हा त्याच भूतकाळात रेंगाळत राहू इच्छितात देशातील लोक आनंदी नाहीत, ते अनेक समस्यांनी त्रस्त आहेत आणि सरकार त्या समस्यांवर तोडगा काढत नाही. बेरोजगारी, महागाई, पेपर लीक होणे, आरक्षणासोबत खेळखंडोबा आणि महिलांच्या समस्यांसारख्या ज्वलंत मुद्द्यांवर सदनमध्ये चर्चा का होत नाही? पंतप्रधान भाषण चांगले देतात, पण तथ्यांच्या बाबतीत ते कमजोर पडतात, असा हल्लाबोल त्यांनी केला. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात नमूद केले की, 1896 मध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत पहिल्यांदा गायले. मात्र, हे कोणत्या अधिवेशनात गायले हे त्यांनी सांगितले नाही. ते काँग्रेसचे अधिवेशन होते.
जेवढ्या दिवसांपासून मोदीजी पंतप्रधान आहेत, तेवढेच दिवस नेहरू जेलमध्ये राहिले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना प्रियांका म्हणाल्या, “पंडित जवाहरलाल नेहरू हे देशासाठी जगले आणि देशासाठीच मरण पावले. जेवढ्या दिवसांपासून मोदीजी पंतप्रधान आहेत, जवळपास तेवढेच दिवस नेहरू जेलमध्ये राहिले.”
तर आज तुम्ही चंद्र मोहिमा केल्या असत्या का?
पंडित नेहरूंच्या योगदानासंदर्भात बोलताना, “जर नेहरुंनी इस्रोची निर्मिती केली नसती, तर आज तुम्ही चंद्र मोहिमा केल्या असत्या का? असा प्रश्न प्रियांका यांनी उपस्थित केला. तसेच, डीआरडीओ, आयआयटी, आयआयएम, एम्स, बीएचईएल, सेल सारख्या संस्थांची निर्मिती केली नसती, तर आज देश विकसित झाला नसता. नेहरूंच्या चुका आणि त्यांनी केलेले कथित अपमान याबद्दल पंतप्रधानांना जितक्या तक्रारी आहेत, त्या सर्वांची त्यांनी एक यादी करावी. त्यानंतर वेळ निश्चित करून यावर एकदा चर्चा करावी आणि एकदाचे हे प्रकरण बंद करावे असे आव्हानही त्यांनी दिले. वंदे मातरमवरील चर्चेच्या माध्यमातून देशाचे लक्ष खऱ्या मुद्द्यांपासून दूर नेले जात आहे. महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे, प्रदुषण आदी गंभीर मुद्द्यांवर चर्चा न करता सरकार छोटीशी चर्चा करून जनतेची दिशाभूल करत आहे. असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




