पारनेर |तालुका प्रतिनिधी|Parner
मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत अटीतटीच्या झालेल्या पारनेर- नगर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार काशिनाथ दाते 1 हजार 526 मतांनी विजयी झाले. काशिनाथ दाते यांना 1 लाख 13 हजार 630 मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राणी नीलेश लंके यांचा पराभव झाला. त्यांना 1 लाख 12 हजार 104 मते मिळाली. संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीची पडझड होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) उमेदवार राणी लंके यांनी निकराची लढत दिली. शेवटच्या फेरीपर्यंत अतितटीची लढत झाली.
दरम्यान, तुतारी चिन्हाशी साधर्म्य असणार्या पिपाणी (ट्रम्पेट) निवडणूक चिन्ह असलेले उमेदवार सखाराम सरक यांना मिळालेल्या 3 हजार 572 मतांचा फटका राणी लंके यांना बसला असल्याचे बोलले जात आहे. शनिवारी (23 ऑक्टोबर) सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. सकाळी पावणेनऊ वाजता जाहीर झालेल्या पहिल्या फेरीत काशिनाथ दाते यांनी 1 हजार 507 मतांची आघाडी घेतली. त्यानंतर पाचव्या, दहाव्या आणि बाराव्या फेर्यांचा अपवाद वगळता 14 व्या फेरीपर्यंत काशिनाथ दाते यांची आघाडी वाढत गेली. 14 व्या फेरीपर्यंत दाते हे 7 हजार 402 मतांनी आघाडीवर होते.पंधराव्या फेरीत दाते यांचे मताधिक्य 1 हजार 449 मतांनी कमी होऊन ते 5 हजार 953 मतापर्यंत खाली आले. 16 आणि 24 व्या फेरीचा अपवाद वगळता दाते यांचे मताधिक्य सातत्याने कमी होत होते. मात्र शेवटच्या फेरीपर्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत शेवटच्या, 27 व्या फेरीअखेर महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते 1 हजार 526 मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी जाहीर केले.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर नीलेश लंके यांनी अजित पवार यांना साथ देण्याचे ठरविले. मात्र लोकसभेची निवडणूक जाहीर होताच लंके यांनी अजित पवार यांना सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांनी लंके यांना लोकसभेसाठी अहमदनगर दक्षिण मतदार संघातून उमेदवारी दिली. त्यात लंके विजयी झाले. त्यानंतर मात्र त्यांनी आपली पत्नी राणी लंके यांना पारनेर- नगर मतदार संघाचे आमदार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या सर्व घडामोडी पारनेर तालुक्यात घडत असताना खा. लंके यांच्यासोबत सर्वांनी जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी अजित पवार पक्षात कोणी पदाधिकारी नसताना एकमात्र प्रशांत गायकवाड यांनी पारनेर तालुक्यात घड्याळाची टिक टिक चालू ठेवली व परफेक्ट टाईम लावला. विधानसभा निवडणूक जाहीर होताच काशिनाथ दाते यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवून पारनेर- नगर विधानसभा मतदार संघातून त्यांना तिकीट दिले.
दरम्यान, निवडणुकीला अवघे पंधरा दिवस बाकी असताना उमेदवारी मिळाल्यानंतर काशिनाथ दाते यांनी अत्यंत संयमी भूमिका घेत मुत्सद्दीपणाने निवडणूक हाती घेतली. खासदार नीलेश लंके यांनी विरोधकांची मोट बांधली. नंदकुमार झावरे यांच्या पहिल्या निवडणुकीपासून ते विजय औटी यांच्या शेवटच्या निवडणुकीपर्यंतचा अनुभव त्यांच्याकडे होताच त्यातून या तिघांच्याही सहवासात आलेल्या प्रत्येकांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्याच जोरावर त्यांनी संघटन केले. जिवाभावाच्या कार्यकर्त्यांवर जबाबदारी टाकली आणि पायाला भिंगरी बांधली. सोबतीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची रसद होतीच, त्यातून विजयश्री खेचून आणण्यात ये यशस्वी झाले. प्रभावी अपक्ष उमेदवार असल्याने या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते.