Tuesday, March 25, 2025
Homeनगरपारनेर कारखाना विक्री गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करा

पारनेर कारखाना विक्री गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करा

पारनेर न्यायालयाचा आदेश, सभासदांचा जल्लोष

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना बेकायदा विक्री केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई आणि क्रांती शुगर अँड पॉवर प्रा.लि. पुणे या खासगी कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पारनेर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश राहुल देशपांडे यांनी दिले आहेत, अशी माहिती कारखान्याचे सभासद बबनराव कवाद व साहेबराव मोरे यांनी दिली. दरम्यान, पारनेर साखर कारखाना विक्रीतील दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश होताच जवळे येथील ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांनी फटाके उडवून व पेढे वाढून जल्लोष केला. याबाबत कवाद यांनी सविस्तर दिलेली माहिती अशी, पारनेर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता विक्री करण्यासाठी राज्य सहकारी बँकेने साडेचौदा कोटी रुपये कर्जाचे एक बनावट गहाणखत तयार करून कारखान्यावर कर्जाचा फुगवटा निर्माण केला होता व त्यानंतर कारखान्याची विक्रीची बेकायदा प्रक्रिया पूर्ण केली.

- Advertisement -

या कारखान्याच्या विक्रीसाठी केवळ पाचशे रुपये मुद्रांक शुल्क देऊन सुमारे दीड कोटी रुपयांचा महसूल बुडवला होता. ज्या दिनांकास कारखान्याची विक्री केली, त्याच दिनांकास क्रांती शुगर या खरेदीदार कंपनीला कारखाना विकत घेण्याकरीता त्याच मालमत्तेवर गहाणखत घेवून कर्ज पुरवठा केला. कारखाना विक्रीच्या खरेदीखताला बोजा नसलेला बनावट सात-बारा जोडण्यात आला. कारखाना विकत घेण्यासाठी वापरलेला कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा पांढरा करण्याकरता क्रांती शुगर या कागदोपत्री कंपनीचा वापर करण्यात आला. पारनेर साखर कारखान्याची मालमत्ता केवळ 32 कोटी रुपयांना विकत घेऊन त्याच मालमत्तेवर सुमारे 300 कोटी रुपयांचे कर्ज काढले. पारनेर साखर कारखाना विक्रीतून कर्ज वजा जाता उरलेले सुमारे साडे बारा कोटी रुपये बँकेने कारखान्याला परत केले नाही.

सध्या कारखाना उभा असलेली दहा हेक्टर औद्योगिक बिगरशेती जमीन राज्य सहकारी बँकेकडे तारण नसताना विकली, असा दावाही कवाद यांनी केला. यासंदर्भात ते पुढे म्हणाले, पारनेर कारखाना विक्रीच्या या सर्व गैरव्यवहारांबाबत कारखाना बचाव व पुनर्जीवन समितीने सतरा हजार सभासदांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) खंडपीठाकडे याचिका दाखल केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या सूचनांप्रमाणे कारखाना बचाव समितीने पारनेर न्यायालयात विक्रीतील दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर कारखाना विक्रीतील दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयासमोर कारखाना बचाव समितीच्यावतीने अ‍ॅड. रामदास घावटे व अ‍ॅड. उन्मेश चौधरी यांनी बाजू मांडली.

आरोपींना तातडीने अटक करा
याबाबत कवाद व मोरे यांनी, गुन्हा दाखल करून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. पारनेर सहकारी साखर कारखान्याची, शेतकरी, सभासदांची कोट्यावधी किमतीची सार्वजनिक मालमत्ता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने गैरमार्गाचा वापर करून विक्री केली आहे. या प्रकरणात राज्य सहकारी बँकेचे दोन अधिकारी, क्रांती शुगर कंपनीचे नऊ संचालक व देवीभोयरेचा तत्कालीन तलाठी यांचा आरोपींत समावेश आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पोलिसांनी पालन करून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी करणारे निवेदन पारनेर पोलिसांना देत आहोत, असे कवाद व मोरे यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...