पारनेर । तालुका प्रतिनिधी
ग्रामीण भागात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पारनेर तालुक्यातील म्हस्केवाडी येथे एका मेंढपाळ महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, घटनेचे गांभीर्य ओळखून पारनेर पोलिसांनी वेगवान कामगिरी करत, मुख्य आरोपीला अवघ्या २४ तासांच्या आत गजाआड केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार दिनांक २० मे रोजी रात्री म्हस्केवाडी परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. पीडित मेंढपाळ महिला आपल्या लहान मुलासह मेंढ्यांच्या वाड्यावर झोपलेली असताना, आरोपी सुभाष संतोष शेंडगे (रा. काळेवस्ती, निघोज, सध्या रा. म्हस्केवाडी) याने तिथे प्रवेश केला. त्याने पीडितेच्या जिवाला मारण्याची धमकी देत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. या धक्कादायक प्रसंगानंतर पीडित महिलेने तात्काळ पोलिसांत धाव घेतली. पारनेर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(१), ११५(२) आणि ३५२(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला अत्याचाराचा हा गुन्हा अत्यंत गंभीर असल्याने, पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. त्यांनी गुन्हे शोध पथकाला आरोपीचा माग काढण्यासाठी रवाना केले. पथकाने चोख कामगिरी बजावत गुन्हा घडल्यापासून अवघ्या २४ तासांच्या आत नराधम आरोपी सुभाष शेंडगे याला जेरबंद केले. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि संतोष खेडकर, पोसई चांगदेव हंडाळ, अमोल धामणे, कल्याण लगड, गणेश डोंगरे, सारंग वाघ, विशाल टकले, राहुल गुंडू, नितीन शिंदे आणि अरुण सांगळे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास ग्रेड पोसई मारुती कोळपे करत आहेत.




