अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणार्यांविरूध्द कारवाई केली असून या कारवाईत एक जणाला ताब्यात घेत 15 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास माहिती मिळाली की काही इसम खडकवाडी परिसरात कामटवाडीकडून वाळूची अवैध वाहतूक करीत आहेत. त्यानुसार पथकाने खडकवाडी येथे सापळा रचला असता दोन डंपर त्या मार्गावरून येताना दिसले. पथकाने थांबण्याचा इशारा दिल्यानंतर एक डंपर थांबला, तर दुसरा चालक वाहनासह पसार झाला. थांबविण्यात आलेल्या डंपरची तपासणी केली असता त्यामध्ये चार ब्रास वाळू आढळली.
चालकाने त्याचे नाव रोहित शाहुराज साळवे (वय 26, रा. कासारे, ता. पारनेर) असे सांगितले. त्याच्याकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे आढळल्यामुळे पंचासमक्ष डंपर व त्यातील वाळूसह एकूण 15 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत रोहित साळवे याने पसार झालेल्या दुसर्या डंपरमधील चालकाचे नाव अमोल रक्टे (पूर्ण नाव माहिती नाही) व मालकाचे नाव बापू बोरूडे (पूर्ण नाव माहिती नाही) असल्याचे सांगितले. दोघे पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार गणेश लोंढे, संदीप दरंदले, विशाल तनपुरे, रमीज आत्तार, मनोज लातुरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.