पारनेर |प्रतिनिधी| Parner
पारनेर नगरपंचायतीची आर्थिक वर्ष 2024 -2025, तसेच गतवर्षीचीही मोठ्या प्रमाणावर थकबाकी असल्याने नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांचे आदेशानुसार धडक वसुली सुरुवात केली आहे. यामुळे थकबाकीदार असणार्या 13 फ्लॅटला सील ठोकण्यात आले. सध्या पारनेर शहरात नगर पंचायतीने थकीत कराची वसुली मोहीम हाती घेतली आहे. यात सायली ढुमे, लिपिक संजय शिंदे, संतोष आंबुले, राजेंद्र पठारे, छबन औटी, अशोक सुपारे, सुप्रिया गायकवाड यांनी मालमत्ता कराची थकबाकी असल्याने शहरातील ज्ञानेश सदाशिव सुदामे यांचे कृष्णकुंज फेज 1 मधील 2 व फेज 2 मधील 13 सदनिकांना सील केले.
तसेच मोठ्या थकबाकीदारांच्या नावाच्या फ्लेक्स तयार करणे सुरू असून हे फ्लेक्स चौकाचौकात व सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच नगर पंचायतीच्या हद्दीतील दीर्घकाळ थकबाकीदार आहेत, अशा थकबाकीदारांवर कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे. थकबाकीदार यांची मालमत्ता सील करणे, तसेच जप्तीची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. सर्व थकबाकीदारांनी थकबाकी भरून नगरपंचायतीस सहकार्य करावे, अन्यथा थकीत असलेल्या रक्कमेत मासिक 2 टक्के दराने शास्ती आकारण्यात येणार असून थकबाकीदार यांनी 31 मार्चअखेर असलेली थकबाकी व चालू मालमत्ता कराची रक्कम नगर पंचायतीस भरून कारवाई टाळावी, असे आवाहन मुख्याधिकारी विनय शिपाई यांनी केले आहे.