Saturday, May 25, 2024
Homeनगरपारनेर तालुका दूध संघ अवसायानात काढण्याची नोटीस

पारनेर तालुका दूध संघ अवसायानात काढण्याची नोटीस

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेर तालुका सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीनंतर आता वैभवशाली पारनेर तालुका सहकारी दूध संघ बंद होण्याच्या मार्गावर आहे. हा संघ शासकीय महानंदा संघास दूध घालत नसल्याने अवसायनात काढण्यात का येऊ नये, अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस नाशिकचे विभागीय आयुक्त (दुग्ध) यांनी बजावली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात नावाजलेला 70 हजार लिटर प्रतिदिन दूध संकलन करणार्‍या संघावर सध्या प्रशासक आहे. संघाचे अकरा हजार लिटर दूध संकलन सध्या होत आहे. परंतु हे दूध शासनाच्या महानंदा दूध डेअरीस जात नाही. साखर कारखान्याप्रमाणे दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या व दूध संस्थांच्या दृष्टीने तालुका सहकारी दूध संघ जिव्हाळ्याचा आहे. ही संस्था बंद होण्याच्या मार्गावर आहे. संघ बंद झाल्यास तालुक्यातील दूध संस्थांचेही अस्तित्व संपणार आहे. तालुका दूध संघाची स्थापना 2003 साली झाली. नंतर सततच दूध संकलन वाढत जाऊन सुमारे 70 हजार लिटर दूध संकलन होत होते. सुमारे सात वर्षे सुरळीत सुरू असलेल्या संघाचे खासगी दूध संकलन व प्रक्रिया करणार्‍या उद्योजकांमुळे दूध कमी होत गेले. अखेर 2010 साली दूध संघ बंद पडला.

नंतर दूध संघाचे 2017 साली पुनरुज्जीवन झाले. पुढे 2020 मध्ये पुन्हा दूध संघाने संकलन सुरू केले. मात्र, खासगी दूध संकलन करणार्‍या संकलन केंद्रांपुढे तालुका दूध संघाचा टिकाव लागत नसल्याने दूध संकलनात वाढ न झाल्याने तीन वर्षात फक्त 11 हजार लिटर प्रतिदिन दूध संकलन झाले, तसेच संघाने महानंदास दूध न घातल्याने आता नाशिक विभागीय आयुक्त (दुग्ध) यांनी आपला दूध संघ अवसायनात काढण्यात का येऊ नये, अशी नोटीस बजावली आहे. संघ अवसायनात निघाला, तर तालुका दूध संघाबरोबरच तालुक्यातील सहकारी दूध संस्थांचेही अस्तित्व संपुष्टात येणार आहे.

महानंदास दूध घालणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. खासगी संस्था अधिक भाव देऊन वाहतुकीचे भाडे सुद्धा देतात. केवळ महानंदास दूध घालत नाही म्हणून दूध संघ बंद करू नये, अशा मागणीचे पत्र आम्ही आयुक्तांना पाठविले आहे.

– एस. जी. गाढे, प्रशासक, पारनेर तालुका दूध संघ

तालुका दूध संघ हा उत्पादक, तसेच संस्थांच्या प्रयत्नांतून उभा राहिला आहे. तालुक्याच्यादृष्टीने ही सहकारी संस्था तालुक्याचे भूषण आहे. ती बंद होणार नाही, यासाठी आम्ही पालकमंत्री राधकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यामातून प्रयत्न करणार आहोत.

– राहुल शिंदे, तालुकाध्यक्ष, भाजप

- Advertisment -

ताज्या बातम्या