पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
बुधवारी रात्री व गुरुवारी दुपारनंतर पारनेर तालुक्यातील अनेक गावात अवकाळी पाऊस कोसळला. तालुक्यातील काही गावांत गारपिट देखील झाली असून यामुळे ऐन उन्हाळ्यात पारनेरच्या रस्त्यावरून खळखळून पाणी वाहिले. या अवकाळी पावसामुळे पिकांना मोठा फटका बसणार असून पुढे पावसाळ्यात पाऊस होणार की नाही, यामुळे शेतकरी आतापासून चिंतेत आला आहे.
पारनेर तालुक्यात बुधवारी रात्री आणि गुरुवारी सायंकाळी अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा बसला. तालुक्यात काही ठिकाणी वादळी वार्यासह पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील काकणेवाडी येथे मोठ्या प्रमाणात गारा पडल्या आहेत. राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पावसासह गारपीट होत आहे. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे बळीराजा चिंतेत आला असून त्याच्या डोळ्यात पाणी आले आहे. एका रात्रीत शेतातील पीक आडवं झाले आहे. शेतकर्यांच्या आंबा, द्राक्ष, पपई यासह सर्व फळबागांचे नुकसान झाले आहे. त्याचसोबत लिंबू, कांदा, मका या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
काही ठिकाणी घरांची देखील पडझड झाली आहे. तर अनेक ठिकाणी जोराच्या वादळ वार्यामुळेे शेतकर्यांच्या कांदा पिकावर झाकलेला कागद उडून गेला असून कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकर्यांची सध्या उन्हाळी कांदा काढणीची लगबग सुरू आहे. औद्योगिक वसाहतीमुळे उन्हात कांदा काढण्यासाठी मजूर मिळत नाही. त्यामुळे शेतकर्यांना परप्रांतीय किंवा विदर्भ मराठवाड्यातील मजूर जोडीने बोलावे लागतात. त्यांना जादा मजुरीसह जेवन द्यावे लागते. सध्या कांदा पिकांची काढणी सुरू असतांना आणि कांद्याला भाव नसतांना आता आसमानी संकटाने शेतकर्यांचे मोठे नुकसान केले आहे.
पारनेर, सुपा, टाकळी, तिखोल, कान्हूरला पाऊस
पारनेरमध्ये बुधवारी आणि गुरुवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. बुधवारी सायंकाळी पारनेर, सुपा, टाकळी ढोकेश्वर, ढोकी, धोत्रे, वडगाव सावताळ, तिखोलसह अनेक गावांना अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी सोसाट्याच्या वार्यासह पाऊस झाला. या पावसामुळे कांदा, पिकाचे मोठे नुकसान झाले तर गुरुवारी दुपारी तीन ते चारनंतर पावसास सुरवात झाली. कमी जास्त प्रमाणात जवळजवळ तासभर पाऊस पडला.
या पिकांचे नुकसान
अवकाळी पावसाचा कांद्याबरोबरच गहू, टोमॅटो, वाटाणा या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांची एकच धांदल उडाली. झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते.