ग्रामपंचायतीचा पुढाकार ः मुलांच्या मागण्यांनीे वेधले सर्वांचे लक्ष
पारनेर (तालुका प्रतिनिधी)- बाल ग्रामसभेचे आयोजन करून त्यांचे प्रश्न जाणून घेणारी तालुक्यातील वनकुटे ही देशातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. पावसाळ्यात होणारी शाळेचे गळती थांबवा, संरक्षक भिंत द्या, शौचालयाची दुरुस्ती करा अशा अनेक मागण्या करीत विद्यार्थ्यांनी बाल ग्रामसभेत त्यांच्या अधिकाराची ग्रामस्थांना जाणीव करून दिली.
पंधराव्या आयोगामार्फत येणारा निधी आरोग्य शिक्षण तसेच मूलभूत गरजांवर खर्च करण्याचे बंधन असून शैक्षणिक सुविधावर करावयाचा खर्च विद्यार्थ्यांशी हितगुज करूनच करण्याचा निर्णय सरपंच राहुल झावरे यांच्या नेतृत्वाखालील ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी घेतला.
शाळेत वर्तमानपत्र वाचण्याची सुविधा असली तरी विविध पुस्तकांच्या वाचनासाठी वाचनालय असावे.2 किलोमीटर अंतरावरील विद्यार्थ्यांना सायकल उपलब्ध करून द्यावी, खेळाचे मैदान व साहित्य असावे, शाळेच्या इमारतीस रंगरंगोटी करावी अशा अनेक मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या. विद्यार्थ्यांच्या मागण्यांची नोंद इतिवृत्तात करण्यात येऊन त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे झावरे यांनी मान्य केले.
यावेळी ग्रामसभेस उपस्थित असलेले गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांनी ग्रामस्थांमध्ये जि .प .शाळेच्या शिक्षणाबद्दल असलेली आस्था पाहून समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी स्वतंत्र ग्रामसभा घेणारी वनकुटे पहिली ग्रामपंचायत ठरली असून, शाळेसाठी असलेला ग्रामस्थांचा लोकसहभाग हा इतर गावांसाठी आदर्शवत आहे. ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या शाळांनी ग्रामसभेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवून विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधांची मागणी पूर्ण करून घेण्याचे आवाहन बुगे यांनी केले.पळशीचे सरपंच गणेश मधे यांनीही या ग्रामसभेचे कौतुक केले.
झावरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या ग्राम सभेस उपसरपंच अर्जुन कुलकर्णी ,बाबाजी गागरे, विकास गागरे ,दिपक खामकर ,बबन मुसळे ग्रामसेवक बबन थोरात ,मुख्याध्यापक सुनील खामकर आदींसह ग्रामस्थ ,विद्यार्थी उपस्थित होते.
बाल ग्रामसभेस सुरुवात झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी त्यांना आवश्यक असलेल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, अशी आग्रही मागणी केली. सर्वत्र डिजीटल क्लासरुम सुरू झालेले असताना आमच्या शाळेत ही सुविधा का नाही, या प्रश्नाने ग्रामस्थांना निरुत्तर केले. त्यावर तात्काळ निर्णय घेण्याचे मान्य करण्यात आले.