पारोळा (प्रतिनिधी) –
तालुक्यातील तरडी येथील (२३) वर्षीय शेतकऱ्याला त्याच्या स्वतःच्या शेतात सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना आज दि.1 रोजी सकाळी सहा वाजता घडली.
येथील समाधान ईश्वर पाटील (वय २३) हा तरूण दररोज पहाटे त्याच्या जोगलखेडे रस्त्यावरील तरडी शिवारातील शेताजवळ जाऊन शेतातील इलेक्ट्रिक मोटार सुरू करून पाणी लावून व्यायाम करत होता, त्याप्रमाणे आजही पहाटे समाधान आपल्या मित्रांसोबत व्यायामासाठी गेला असता मित्रांना सांगितले कि मी मोटर चालू करून येतो तो उशिरापर्यंत न आल्याने मित्रांनी शेताकडे जाऊन पाहिले असता तो बेशुद्धावस्थेत पडलेला दिसला. व त्यास सर्पदंश झाल्याचे दिसून आले.
समाधानला या स्थितीत बघीतल्यानंतर मित्र जय गुलाब पाटील याने नातेवाईकांना सांगितल्यानंतर गावातील शशिकांत लोटन पाटील, सुभाष वामन पाटील, विलास नथू पाटील, डॉक्टर पि.के पाटील, दिलीप पाटील यांनी त्यास पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता त्यास डॉक्टर योगेश साळुंखे यांनी तपासून मृत घोषित केले.
याबाबत पारोळा पोस्टेला किरण रविंद्र पाटील यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल आशिष चौधरी हे करीत आहेत.
त्याच्या पश्चात आई, वडील व एक भाऊ असा परिवार आहे घरचा कर्ता मुलगा गेल्याने आई वडिलांनी एकच हंबरडा फोडला, तरडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.