पुणे (प्रतिनिधी)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाचे आणि बनावट सहीचे पत्र समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या पत्राच्या आधारे मुंढवा येथील जमिनीच्या कथित प्रकरणाशी त्यांचा संबंध असल्याचा खोटा दावा केला जात असून, हा प्रकार पूर्णतः बनावट आणि दिशाभूल करणारा असल्याचे पार्थ पवार यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत पार्थ पवार यांच्याकडून संबंधित सहीचे खंडन करण्यात आले असून या प्रकरणाची चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
व्हायरल होत असलेल्या पत्रात पार्थ पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मुंढवा येथील जमिनीबाबत अर्ज केल्याचा उल्लेख आहे. मात्र, या पत्राशी आपला कोणताही संबंध नसून आपण असे कोणतेही पत्र लिहिलेले नाही किंवा त्यावर सही केलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या पत्रावर संबंधित शासकीय कार्यालयाची कोणतीही पोहोच पावती नसल्याने ते बनावट असल्याचे प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट होत आहे.
या प्रकरणी पार्थ पवार यांनी पुणे शहरातील आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर गुन्हे विभागाकडे अज्ञात व्यक्तींविरोधात फौजदारी तक्रार दाखल केली आहे. समाजमाध्यमांवर खोटी कागदपत्रे प्रसारित करून बदनामी करण्याचा आणि खोट्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.
दरम्यान, यापूर्वी २०२१ साली महसूल विभागाकडे सादर करण्यात आलेल्या एका अर्जाचा गैरवापर करून सध्याच्या बनावट पत्रांशी त्याची सांगड घालण्यात येत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. मात्र तो अर्ज वेगळ्या स्वरूपाचा असून सध्या व्हायरल होत असलेल्या पत्रांशी त्याचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकारामागे कोण आहे, बनावट सही कोणी केली आणि समाजमाध्यमांवर हा खोटा प्रचार कोणी पसरवला, याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पार्थ पवार यांनी केली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मसाळ यांनी सांगितले की, पार्थ पवार यांच्याशी संबंधित एक अर्ज आर्थिक गुन्हे शाखेकडे प्राप्त झालेला आहे संबंधित अर्जाची चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याकरीता सायबर गुन्हे शाखेचे देखील मदत घेण्यात येणार आहे.




