Saturday, May 4, 2024
Homeराजकीयराष्ट्रवादीत कोंडी होत असेलतर; पार्थ पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

राष्ट्रवादीत कोंडी होत असेलतर; पार्थ पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

मुंबई |किशोर आपटे

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि राज्याच्या राजकारणातील भिष्माचार्य शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्या बाबत काल केलेल्या वक्तव्यांची राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या वक्तव्याचे नेमके कारण आणि परिणाम काय? याचा शोध घेताना राष्ट्रवादीच्या विरोधी गटातून वेगळीच माहिती समोर येत आहे. सातत्याने पवार घराण्यात कोंडी होत असल्याने पार्थ पवार आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामध्ये पार्थ पवार पक्ष सोडणार असल्याच्या शक्यते पासून ते राजकीय संन्यास घेणार असल्याच्या शक्यतांपर्यतच्या चर्चा केल्या जात आहेत.

- Advertisement -

याबाबत पार्थ पवार यांनी मोठा निर्णय घेण्याची शक्यता लक्षात घेवून त्यांची समजूत काढण्याचे काम खासदार सुप्रिया सुळे यांनी सुरू केले असून त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आज मंत्रालयात घाईने जावून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत पार्थबद्दल काही चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पार्थ वेगळा मार्ग निवडणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आजोबां विरोधात नातू मोठा निर्णय घेणार का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांच्या घरातच राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असले तरी भाजपच्या नेत्यांनी याबाबत उघड बोलणे टाळले आहे. शरद पवार यांनी नातू पार्थ यांना प्रसारमाध्यमां समोर अपरिपक्व असल्याचे सांगितल्यानंतर राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार हे दोन नेते समोरासमोर असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकरणावर अजित पवार अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत.

पार्थ पवार कोणताही निर्णय आपल्या वडिलांना विचारल्याशिवाय घेऊ शकत नाही. तसेच त्यानी तूर्तास आपण काही प्रतिक्रीया देणार नसल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे पार्थ पवार यांची पाठराखण करण्यासाठी त्यांच्या आजोळकडून सक्रीयता दाखवली जात आहे. त्यामुळे भाजपकडून ऑपरेशन लोटस सक्रीय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. माध्यमांना माहिती देताना राजकीय सूत्रांनी पार्थ पवार काहीतरी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. प्रसारमाध्यमांसमोर अपमान झाल्याने ते पक्ष सोडण्याचा निर्णय घेऊ शकतात, असेही मत काही राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

राष्ट्रवादी विरोधी बाजूने येणा-या माहितीनुसार पदवीधर मतदारसंघात पार्थ पवार यांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह अजित पवार यांचा होता. परंतू त्याला शरद पवार यांचा विरोध आहे. पदवीधर मतदारसंघात पार्थ पवार यांना उमेदवारी देता येणार नाही,अशी भूमिका शरद पवार यांनी घेतल्याने पार्थ पवारांकडून सातत्याने शरद पवार यांच्या राजकीय भुमिकेविरोधी भुमिका घेतली जात आहे त्यावरुन वाद निर्माण झाला, असल्याचे मत सूत्रांनी व्यक्त केले आहे.

राष्ट्रवादीच्या तिकिटावर पार्थ पवार २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून हट्टाने निवडणुकीला उभे राहिले होते. मात्र शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी जवळपास २लाख मतांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर काही काळ ते राजकीय घडामोडी पासून दूर होते. पक्षात राजकीय कोंडी होत असेल तर पक्षविरोधी भुमिका घेत पक्षाच्या धोरणाविरोधात जाण्याची तयारी असल्याचे संकेत त्यानी गेल्या काही दिवसांपासून दाखविल्याने शरद पवार यांनी त्यांना अपरिपक्व म्हणत वडीलधारे म्हणून शांत बसण्यासाठी दरडावणे राष्ट्रवादीच्या विरोधकांना सुखावणारे असले तरी त्यातून नव्या राजकारणाची नांदी होणार की नाही हे समजण्यास काही वेळ जावा लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या