Thursday, October 31, 2024
Homeशब्दगंधपक्ष नव्याने उभा करायचा तर..

पक्ष नव्याने उभा करायचा तर..

भाजपवर मात करायची असेल तर काँग्रेसला पर्यायी आर्थिक-सामाजिक कार्यक्रम घेऊन लोकांपुढे जावे लागेल. पक्षाच्या सशक्तीकरणासाठी उपाययोजना करावी लागेल. केवळ घराण्याच्या आधारे राज्य करण्याचे दिवस संपले आहेत. नवे मुद्दे घेऊन, तरुणांना आकर्षित करूनच काँग्रेसला भाजपशी टक्कर देता येईल.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ‘मीच पक्षाची पूर्णवेळ अध्यक्ष आहे आणि काही मतभेद असले तर थेट माझ्याशी संवाद साधावा. प्रसारमाध्यमांशी नव्हे’, अशी ताकीद देऊन बंडखोरांना अलीकडेच चूप केले.

काँग्रेसच्या पक्षांतर्गत बैठकाच होत नसल्यामुळे आम्हाला आमची मते मांडायला वावच नाही. पक्षश्रेष्ठी भेटीची वेळ देत नाहीत. त्यामुळे माध्यामंसमोर जाण्याखेरीज दुसरा उपायच नाही, असे उद्गार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीयमंत्री कपिल सिब्बल यांनी नुकतेच काढले होते. एवढेच नव्हे, तर आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध पक्षाच्या नेत्यांना भोजनासाठी घरी आमंत्रित केले होते.

- Advertisement -

त्यात लालूप्रसाद यादव यांचाही समावेश होता. बिहार विधानसभा निवडणुकांनंतर लालूंचा राष्ट्रीय जनता दल पक्ष आणि काँग्रेसदरम्यान मतभेद निर्माण झाले आहेत. पंजाब प्रदेशाध्यक्षपदी नवज्योतसिंग सिद्धू यांची निवड झाली आणि त्यांच्या दोन सल्लागारांनी पाकिस्तान आणि काश्मीरबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली.

त्याबाबत काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी जाहीर मतप्रदर्शन करून, सिद्धू आणि त्यांच्या सल्लागारांवर तोंडसुख घेतले होते. काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष नाही, अशी टीका केवळ सिब्बल यांनीच नव्हे, तर जी-23 च्या बंडखोर नेत्यांनी केली होती. काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका लवकरात लवकर होऊन पक्षाचा अध्यक्ष निवडला जावा, अशी मागणी जी-23 च्या पत्रलेखकांनी केली होती.

सोनियाजी आजारपणामुळे पूर्णवेळ काम करू शकत नाहीत, हिंडू-फिरू शकत नाहीत, सातत्याने बैठका घेऊ शकत नाहीत हे जी-23 मधल्या बंडखोर नेत्यांचे मत होते आणि ते वास्तवाला धरूनही आहे. मात्र, तरीही आपण अध्यक्ष म्हणून पूर्णवेळ काम करत असल्याचा सोनियाजींचा दावा आश्चर्यकारक म्हणावा लागेल.

2019 ची लोकसभा निवडणूक होऊन अडीच वर्षे झाली, तरी देखील काँग्रेसला अध्यक्षपदाचा निर्णय घेता येऊ नये आणि त्याबद्दल कोणी बोलले तर त्याला बंडखोर ठरवायचे, हे अजिबात पटणारे नाही. आता नवा अध्यक्ष 2022 मध्ये, म्हणजे एक वर्षाने निवडला जाणार आहे. या अगोदर तो गेल्या जूनमध्ये निवडला जाणार होता. काँग्रेस कार्यकारी समितीच्या दिल्लीत झालेल्या बैठकीला 45 सदस्य उपस्थित होते आणि पुढील वर्षी पक्षांतर्गत निवडणुका होईपर्यंत सोनियाजीच पक्षाचे नेतृत्व करतील आणि त्याला गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा या जी-23 गटातल्या नेत्यांचीही सहमती आहे, असे काँग्रेसचे संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले.

जी-23 मधल्या अनेक नेत्यांनी राज्यसभेतील पदे दीर्घकाळ उपभोगली आहेत. लोकांमध्ये जाऊन काम करण्याची अनेकांना सवय नाही. मात्र पक्षांतर्गत निवडणुका होऊन अध्यक्ष निवडण्यामुळे त्यास एक प्रकारची अधिकृतता प्राप्त होते. भाजपमध्येही अध्यक्ष वरून लादला जातो, मग आम्ही तसे केले तर काय बिघडले, असा सवाल केला जातो. परंतु भाजपमध्ये संघटनेअंतर्गत निवडणुका होणे, ही प्रक्रिया नियमितपणे होते.

मुळात या पक्षाची संघटना बांधणीच मजबूत आहे. मात्र काँग्रेस हा पक्ष म्हणून एकसंधपणे लोकांसमोर येत नाही. तर काँग्रेस म्हणजे गांधी परिवार, अशीच प्रतिमा जनतेसमोर येते आणि त्याचा भाजपला टीका करण्यासाठी उपयोगही होतो.

एक वर्षानंतर काँग्रेस अध्यक्ष निवडला जाईल, तेव्हा त्या पदी राहुल गांधीच विराजमान होतील, यात शंका नाही. आजघडीला ‘जी-23’ फोडण्यात सोनियाजींना यश आले असून आझाद आणि शर्मा या दोन प्रमुख नेत्यांना त्यांनी आपल्या बाजूला वळवले आहे. राहुलजींनीच अध्यक्ष व्हावे, अशी एकमुखी मागणी करण्यात आली, हेदेखील काँग्रेसच्या परंपरेला धरूनच झाले. आता राहुल म्हणत आहेत की मला यावर विचार करू द्या.

राजीनामा देऊन इतका काळ लोटल्यानंतर या निर्णयाप्रत येण्यासाठी राहुलजींना पुन्हा वेळ हवा आहे. तोपर्यंत सोनियाजींच्या हंगामी अध्यक्षपदास तीन वर्षेे झाली असतील. अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतरही सर्व निर्णय बव्हंशी राहुलच घेत होते. वर्षभरात उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुका पार पडतील. उत्तर प्रदेशमध्ये खरी लढत समाजवादी पार्टी आणि भाजप यांच्यामध्ये आहे. तिथे बहुजन समाज पक्षाची भूमिका संदिग्ध असून काँग्रेसला फारसे स्थान नाही.

लखीमपूरमध्ये शेतकर्‍यांसाठी प्रियांका गांधी लढत असल्या तरी काँग्रेसकडे तिथे संघटनाच नाही. उत्तराखंडमध्ये काँग्रेसला विजय मिळू शकतो. परंतु पंजाबचे काही सांगता येत नाही. कारण तिथे आप मुसंडी मारण्याची शक्यता असून नेतृत्वाच्या प्रश्नावरून काँग्रेसने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. काँग्रेस कार्यकारिणी म्हणजे ‘परिवार बचाव कार्यकारिणी’ असल्याचे भाजपने म्हटले आहे.

काँग्रेसने जिग्नेश मेवानी आणि कन्हैयाकुमारसारखे तरुण नेते पक्षात घेतले असले तरी यामुळे राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरून काँग्रेसला खिंडीत पकडण्यासाठी भाजपला संधी मिळणार आहे. जसजशी देशातली आर्थिक मंदी संपुष्टात येईल आणि अर्थव्यवस्था करोनातून बाहेर येईल, तसतशी तुलनात्मकदृष्ट्या भाजपला अनुकूल स्थिती निर्माण होईल. या पार्श्वभूमीवर भाजपवर मात करायची असेल तर काँग्रेसला पर्यायी आर्थिक-सामाजिक कार्यक्रम घेऊन लोकांपुढे जावे लागेल.

ज्या ज्या राज्यात काँग्रेस संघटना विकलांग आहे, तिथे तिथे सशक्तीकरण करण्यासाठी काय करावे लागेल, हे विचारात घेऊन त्वरेने उपाययोजना करावी लागेल. वेळ खूप कमी आहे. इंदिरा गांधीसारखे करिश्मा असलेले नेतृत्व आज काँग्रेसकडे नाही. त्यामुळे केवळ घराण्याच्या आधारे राज्य करण्याचे दिवस संपले आहेत. नव्या पिढीवर केवळ घराण्याची जादू चालणार नाही. नवे मुद्दे घेऊन, तरुणांना आकर्षित करून घेऊनच काँग्रेसला भाजपशी टक्कर देता येईल.

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यामध्ये काँग्रेस सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार आहे. या पाच राज्यांच्या निवडणुका पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला होणार आहेत तर गुजरात आणि हिमाचल प्रदेशात पुढील वर्षाच्या शेवटी निवडणुका आहेत. गांधी कुटुंबाला थेट आव्हान देण्यासाठी काँग्रेसमध्ये कोणीही नाही. याआधी ज्यांनी कोणी हा प्रयत्न केला, ते तोंडावर आपटले. राजेश पायलट यांच्यापासून जितेंद्रप्रसादपर्यंत सर्वांनी संघटनेत निवडणुका लढवल्या; पण त्यांचा दारूण पराभव झाला. त्यामुळेही येत्या काळात राहुल गांधींना काँग्रेसचे अध्यक्ष बनवले जाईल, असे दिसते. पाचपैकी दोन राज्यांमध्ये तरी काँग्रेसचे सरकार आले तर गांधी कुटुंबावरील टीका कमी होऊ शकते.

पुढील वर्षी ज्या सात राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, तिथे विधानसभेच्या 951 जागा आहेत आणि सध्या काँग्रेसकडे त्यापैकी 203 आमदार आहेत. या सातपैकी पंजाब हे एकमेव असे राज्य आहे, जिथे काँग्रेसची पूर्ण क्षमतेने सत्ता आहे, पण तिथे पक्षांतर्गत गटबाजी वाढली आहे. दरम्यान, गोव्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री लुईझिन्हो फालेरो तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत.

अशा स्थितीत, पक्ष अशा पक्षांतरावर का विचार विनिमय करत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचे सात आमदार असून निवडणूकपूर्व विश्लेषणाचे अंदाज पाहिले तर तिथे आहे त्या जागा टिकवण्याचे मोठे आव्हान काँग्रेससमोर आहे. गुजरातमध्ये 182 पैकी 66 जागा काँग्रेसकडे आहेत. त्याचप्रमाणे पंजाबमधल्या 117 पैकी 80 जागांवर आणि हिमाचल प्रदेशमधल्या 68 पैकी 19 जागांवर काँग्रेसचे आमदार आहेत. पाच राज्यांमध्ये काँग्रेसला अपयश आले तर सोनिया यांच्यावर टीका करण्यासाठी पक्षातील नाराजांची फौज बाह्या सरसावेल, ही वस्तुस्थिती असली तरी यापुढील काळात पक्ष बळकत करण्यासाठी कोणती ठोस पावले उचलली जातात, यावर सारे काही अवलंबून असेल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या