इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri
मुंबईच्या सत्र न्यायालयाने अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबीयांच्या हत्येप्रकरणी दोषी आढळलेला सावत्र पिता परवेझ टाक याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने या महिन्याच्या सुरुवातीला परवेझ टाकला खून आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. सावत्र बापाने लैला, तिची आई आणि चार भावंडांची हत्या केली होती.
या हत्याकांडात परवेझला फाशी होणार की जन्मठेप होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या हत्याकांडाला १३ वर्ष झाली. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात निसर्गरम्य परिसर असलेल्या घाटनदेवी मंदिरासमोरील उंटदरीच्या समोर एकांतात असणारा टुमदार बंगला हा अभिनेत्री लैला खान हिचा होता. सन २०११ च्या दरम्यान याच बंगल्यात सहा जणांचे हत्याकांड केले होते. आजच्या सध्याच्या परिस्थीतीत १३ वर्षानंतर हा बंगला खंडहर झाल्याचे पहावयास मिळत आहे. संपूर्ण बंगला भग्नावस्थेत असुन बंगल्याच्या खिडक्या व दरवाजे पुर्णता गायब झाले आहे.
इगतपुरीच्या फार्महाऊसवर ९ फेब्रुवारी २०११ च्या रात्री लैलाचा सावत्र पिता व मुख्य आरोपी परवेज टाक व त्याचा साथीदार शाकिर हा अजून फरार आहे. या दोघांनी लैला खान, ३० वर्ष, तिची आई सेलिना पटेल, ५१ वर्ष, बहीण झारा ,२५ वर्ष, भाऊ इम्रान , २५ वर्ष, आझिमा , ३२ वर्ष, लैला खानची नातेवाईक रेश्मा सगीर खान, १९ वर्ष या सगळ्यांना जेवनात बेशुद्धीचे औषध टाकून मग एका पाठोपाठ गोळ्या झाडून व डोक्यात लोखंडी रॉडने मारून अमानुष हत्या केली. त्यानंतर बंगल्याच्या आवारातच त्यांना खड्डे करून गाडण्यात आले होते. तसेच बंगला उध्वस्त करून त्याला काही ठिकाणी आग लावण्यात आली होती. हे हत्याकांड घडवून परवेझ व त्याचा साथीदार शाकिर हुसेन हे पसारझाले होते.
एका गुन्ह्याच्या तपासात जम्मू काश्मीर मधून किश्तवाड़ पोलिसांनी परवेझला अटक केली. तेव्हा त्यावेळी तपासात लैला खान हत्याकांडाचा खुलासा झाला. तत्कालीन पोलीसअधीक्षक हिमांशू राय यांनी या तपासाची चक्रे फिरवून मोठे हत्याकांडाचा उलगडा झाला. त्यावेळी लैला खानचे वडील नादिर शाह पटेल यांनी लैला खान व परिवार गायब असल्याची तक्रार दाखल केली होती.