संगमनेर |वार्ताहर| Sangamner
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून मंगळवारपासून (दि.8) सुरू होणार्या पायाभूत चाचणी परीक्षा क्रमांक दोन या पॅट परीक्षेची इयत्ता नववीची प्रश्नपत्रिका फुटली आहे. प्रश्नपत्रिका कशी सोडवावी या संदर्भातील ध्वनीचित्रफीत समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाली आहे. त्यामुळे परीक्षेचे गांभीर्य कमी झाले असून, यासाठी परीक्षेच्या संदर्भात ज्या यू-ट्युब चॅनेलवाल्यांनी प्रश्नपत्रिका फोडण्याचे काम केले त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे वृत्त हाती आले आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतील राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व अनुदानित पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी पॅट प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून मूल्यमापन करण्यात येत आहे. राज्यातील काही यू-ट्युब चॅनेलवाले परीक्षा होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका कशी सोडवावी हे उत्तरासह दाखवत आहेत. त्यातून त्यांना लाखो प्रेक्षक मिळत असले तरी राज्यातील विद्यार्थ्यांचे त्यामुळे अहित होत आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून शिक्षण विभागाकडून पॅट परीक्षा का आणि कशासाठी घेतली जाते, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. शिक्षण विभागाकडून याबाबतची चौकशी करून कारवाई केली जाणार का? असा सवालही विचारला जात आहे. दरम्यान संबंधित यू-ट्युब चॅनलवाल्यांवर पोलिसांद्वारे गुन्हे दाखल करून योग्य ती कारवाई करावी यादृष्टीने शासनाचा विचार सुरु झाल्याचे वृत्त आहे.
राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा व पॅट परीक्षा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार घेतल्या जाव्यात, असे आदेश यापूर्वी देण्यात आले आहेत. त्यावर शिक्षण विभागात बरीच उलटसुलट चर्चा झाली. मुख्याध्यापक संघाने सदरची परीक्षा शिक्षण विभागाने दिलेल्या वेळापत्रकानुसार घेतल्या जातील, मात्र वार्षिक परीक्षा मुख्याध्यापक संघाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार होतील असे पत्रक प्रसिद्ध केले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने स्टार प्रकल्पांतर्गत संकलित मूल्यमापन दोन 2024 -2025 इयत्ता नववीची मराठी प्रथम भाषा ही परीक्षा मंगळवारी घेतली. परंतु, टुटोर एडीएम या यू-ट्युब चॅनलवर ही प्रश्नपत्रिका कशी सोडावी या संदर्भातील चित्रफीत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वीच ही प्रसिद्ध करण्यात आली असून त्यावर स्पष्टपणे पायाभूत चाचणी क्रमांक 2024-25 असा उल्लेख आहे. मराठी विषयाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर काय आहे, या प्रश्नाचे उत्तर कसे लिहावे, अशी सर्व माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षेची गोपनीयता राखली गेली नसल्याचे समोर आले आहे. मात्र याबाबत सत्यता पडताळून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यांच्यावर गुन्हा दाखल करा…
परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका फोडून त्या संदर्भातील माहिती यु-ट्यूब चॅनेलने दिल्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या मूल्यमापन विभागाच्या संगीता शिंदे यांनी पुण्यात गुन्हा दाखल करण्यासाठीचा अर्ज सादर केला आहे. त्यानुसार स्कॉलरशीप स्टडी, ट्विटर एडियम, नॉलेज गंगा, अनिकेत, ए. ए. क्लासेस, प्रशांत वारे आर्ट्स, झेन झेड लर्निंग बाय एम. आर., एच. टी. स्टडी 2.0, लर्न विथ अनु 21, सेमी मराठी क्लास, भाषण मित्रा, आर. डी. क्लब, एस. बी. सुरज क्रिएशन, एम. एच. एज्युकेशन, वाय. सी. एज्युकेशन महाराष्ट्र, शिवसृष्टी रायटिंग, मी गुरुजी, एम. एच. स्टडी, स्टडी टाईम, स्टडी पार्टनर या यू-ट्यूब चॅनेलचा समावेश आहे.