पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
तालुक्यातील आगसखांड येथे दागिने व भांडी स्वच्छ करून देण्याचे आमिष दाखवत दोन अज्ञात भामट्यांनी एका महिलेची सुमारे 58 हजार रुपये किमतीच्या 18 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना सोमवारी (दि. 15) सकाळी घडली. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजया सिताराम कदम (वय 46, रा. आगसखांड) या सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घरासमोर उभ्या होत्या. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी आले. त्यांनी हिंदी भाषेत बोलत आपण एका कंपनीतर्फे भांडी व सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याच्या पावडरची जाहिरात करण्यासाठी आल्याचे सांगितले. तसेच दागिने व भांडी चमकवून देऊ, पैसे नंतर द्या, असे सांगून विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला.
महिलेने घरात कोणी नसल्याचे सांगून त्यांना नंतर येण्यास सांगितले. मात्र त्या दोघांनी पांढर्या व गुलाबी रंगाच्या पावडरच्या पुड्या काढून त्याचे प्रात्यक्षिक दाखविले. त्यानंतर काही वेळासाठी फिर्यादींना काय घडले हे समजले नाही. दरम्यान, त्यांची सून निकिता घराबाहेर आल्यानंतर दागिने कुठे आहेत, अशी विचारणा केली. त्यावेळी महिलेने गळ्यातील व कानातील दागिने तपासले असता ते गायब झाल्याचे निदर्शनास आले.या घटनेत 25 हजार रुपये किमतीचे आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी-मंगळसूत्र, 18 हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेल आणि 15 हजार रुपये किमतीचे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुंबर असे एकूण 58 हजार रुपयांचे दागिने अज्ञात भामट्यांनी फसवणुकीच्या उद्देशाने लंपास केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलीस -ठाण्यात दोन अज्ञात इसमांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
‘हम लोग कंपनी की तरफ से बर्तन और जेवर साफ करने वाले पाउडर का प्रचार करने आए हैं। आपके पास कोई बर्तन या गहने हों तो दीजिए, हम उन्हें चमकाकर देंगे। पैसे भी अभी नहीं, 20 तारीख को दे देना।’ असे म्हणणार्या अनोळखी व्यक्तींना महिलेने ‘घर में कोई नहीं है, मुझे आपकी भाषा समझ में नहीं आती, आप बाद में आइए।’ असे सांगितले. मात्र भामट्यांनी पांढर्या व गुलाबी रंगाच्या पावडरच्या पिशव्या दाखवत विश्वास संपादन केला. त्यानंतर काही वेळातच महिलेच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने गायब झाल्याचे निदर्शनास आले.




