पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
तालुक्यातील मोहटे गावात एकाच रात्री विविध ठिकाणी पाच घरफोड्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या चोरीच्या घटनेने गावातील एका घरातील महिलेला चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवला. यामुळे मोहटे गाव व आजूबाजूचा वाडी वस्तीवरील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. मोहटे गावात झालेल्या चोरीच्या घटनेत सोने- चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा मोठा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भागामध्ये चोरीचे सत्र वाढत आहे. एक ते दीड वर्षांमध्ये मोहटे गाव व परिसरात चोरीचे प्रमाण वाढले आहे.
मिरा देवराम आंधळे, महादेव रामभाऊ दहीफळे, सावळेराम रणमले, कमल मारुती डोंगरे व इतर एक ते दोन ठिकाणी चोरी व चोरीचा प्रयत्न झाला आहे. मोहटा देवी गडाच्या पायथ्याला असलेल्या मोहटादेवी ते पाथर्डी रस्त्यावर दोन ठिकाणी, मोहटे गाव ते मोहटादेवी गडावर येणार्या रस्त्यावर एक ठिकाणी, तर मोहटे गावात दोन ठिकाणी घरफोड्या व चोरीचा प्रयत्न झाला आहे.पाथर्डी पोलिसांत मीरा आंधळे यांनी घरफोडीची फिर्याद दाखल केली असून त्यात त्यांनी म्हटले आहे, मोहटे गावामध्ये माझे घर असून कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास आहे. घरी आई राहत असून 15 दिवसांपूर्वी ती मुंबईला माझ्याबरोबर राहत आहे. 4 जुलै रोजी सकाळी आंधळे यांना फोन आला, तुमच्या घराचा दरवाजा उघडा असून बाजूला कुलूप पडलेले आहे.
त्यानंतर सायंकाळी मीरा आंधळे या घरी आल्या असता त्यांना घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाटाचा दरवाजा उचकटून कपाटात ठेवलेले दागिने व तेथील पेटीत ठेवलेले पैसे चोरी गेले. चोरट्याने घराचे कुलूप कापून घरात प्रवेश करून बेडरुममधील कपाटातील दोन तोळ्यांचे सोन्याचे दागिने व 9 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. त्याचप्रमाणे गाव परिसरात चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या असून त्यातही ऐवज चोरीला गेला आहे. त्याचा तपशील मिळू शकला नाही. एका चोरीच्या घटनेत चोरट्यांनी एका महिलेला घराच्या बाहेरून चाकूचा धाक दाखवून धमकावले. या परिसरातील वाढत्या चोर्यांचा बंदोबस्त करून झालेल्या चोर्यांचा तपास त्वरित लावावा, तसेच पोलिसांची अतिरिक्त गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.