पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
टवाळखोर, रस्त्यावर बेकायदा धावणार्या दुचाकी वाहनांवर पाथर्डी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. टवाळखोर, रोडरोमियो शहरातून भरधाव वाहने मोठ्या प्रमाणात पळवतात. यामध्ये कायद्याचे उल्लंघन केले जाते. वाहतुकीचे नियम मोडणार्या दुचाकीस्वारांवर शनिवारी सकाळपासून पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.
पाथर्डी शहरातील मुख्य चौकातील रस्त्यांवर पोलीस अधिकारी व कर्मचारी उतरून विशेष मोहिम राबवत कारवाई करण्यात आली. शहरात तरुण मुले हे मुलींची छेड काढतात, वाहन भरधाव वेगाने चालवणे, कट मारणे, कर्कश हॉर्न वाजवणे, ट्रिपल सीट वाहन चालवणे, अल्पवयीन व्यक्तीने गाडी चालवणे, बिना नंबरचे वाहन रस्त्यावर आणणे अशा प्रकारे कायदा मोडणार्यांवर पोलिसांनी कारवाई करून मोठ्या स्वरूपात वाहन जप्त केली. त्यांच्यावर आर्थिक दंड ही ठोठवला आहे.
शहरात असणार्या शाळा, कॉलेज, खाजगी क्लासेस या ठिकाणी जाणार्या मुलींना छेडण्याचे प्रकारात वाढ झाली आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था ही धोक्यात आल्याने छेडछाडीचे कृत्य करणार्या टवाळखोरांना आळा बसवावा कायद्याचा धाक निर्माण व्हावा यासाठी दुचाकीस्वारांवर कारवाईची मोहीम राबवण्यात आली आहे. शाळा,विद्यालय, कॉलेज सुटल्यानंतर अक्षरशः मुलींना छेडण्याचे प्रकार टारगट मुलांकडून रोज घडत आहेत, अशा घटनांचा विद्यार्थिनी मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या कारवाईदरम्यान तीसहून अधिक वाहतुकीचे नियम मोडणार्या वाहनांवर आर्थिक दंड केला आहे. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक निरीक्षक कौशल्यराम निरंजन वाघ, उपनिरीक्षक श्रीकांत डांगे यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी कारवाईत सहभाग घेतला होता.