पाथर्डी (तालुका प्रतिनिधी)
नेहमी गजबजलेल्या शहरात पुन्हा एकदा घरफोडीच्या घटनेने खळबळ उडवून दिली आहे. घरमालक काही कामानिमित्त गावी गेल्याची नामी संधी साधत, अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा सेफ्टी दरवाजा तोडून कपाटातील ७० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. ही धक्कादायक घटना पाथर्डी शहरातील अहिल्यानगर रोडवरील शंकरनगर परिसरात उघडकीस आली.
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, शंकरनगर येथील रहिवासी निवृत्ती केशव दहिफळे (वय ५९) हे २४ मे रोजी रात्री आपल्या पत्नीसह कुत्तरवाडी येथील गावी घराच्या कामानिमित्त गेले होते. रात्रभर घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी पाळत ठेवून मध्यरात्री डल्ला मारला. २५ मे रोजी सकाळी शेजारी राहणाऱ्या जिजा गायकवाड यांनी दहिफळे यांच्या घराचे दार उघडे असल्याचे पाहिले आणि त्यांना फोनवरून तातडीने कल्पना दिली.
दहिफळे दाम्पत्य तात्काळ पाथर्डीत घरी परतले. तेव्हा त्यांना मुख्य सेफ्टी दरवाजाचा कोंडा तुटलेला दिसला. चोरट्यांनी घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाटाचे कुलूप तोडले. कपाटातील कपडे अस्ताव्यस्त फेकून ड्रॉवरमध्ये ठेवलेली ७०,००० रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली होती.
२४ मे रोजी रात्री साडेआठ ते २५ मे रोजी सकाळी दहाच्या दरम्यान ही चोरी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.




