Saturday, May 4, 2024
Homeनगरऑक्सिजन पुरवठा करणार्‍या नादुरूस्त मशीनमुळे रूग्णाचा मृत्यू

ऑक्सिजन पुरवठा करणार्‍या नादुरूस्त मशीनमुळे रूग्णाचा मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रूग्णास ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी लागणारे मशीन खरेदी केल्यानंतर ते एका दिवसात खराब झाले. ते पुन्हा दुरूस्त करून देण्यास टाळाटाळ केल्याने रूग्णाचा मृत्यू झाला. या प्रकरणी संबंधीत मशीनचा पुरवठा करणार्‍या व्यक्तीविरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर येथील व्यावसायिक रविराज सुरेश बेलदार (वय 36) यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

नाशिक येथील वरद एन्टरप्राईजेसचे रूपेश मधुकर वरखडे (रा. पीएन्डटी कॉलनी, नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. फिर्यादी बेलदार यांची आई लक्ष्मीबाई सुरेश बेलदार यांना कोविडची लागन झाल्याने 30 एप्रिल, 2021 रोजी उपचारासाठी येथील साईदीप हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांची ऑक्सिजन लेवल कमी होवू लागल्याने ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी लागणारे मशीन हॉस्पिटलमध्ये नसल्याने सदची मशीन फिर्यादी यांना बाहेरून आणण्यास सांगितले. फिर्यादी यांनी जस्ट डायलवरून नंंबर उपलब्ध करून नाशिक येथील वरद एन्टरप्राईजेशी संपर्क केला. मशीनसाठी फिर्यादी यांनी त्यांच्या बहिणीच्या गूगल पे वरून वरद एन्टरप्राईजेस यांच्या भिम युपीआय वर स्कॅन करून टप्या टप्पाने 85 हजार रूपये पाठवले.

त्या नंतर सदरचे मशीन साईदीप हॉस्पिटल येथे आणण्यात आले. दरम्यान मशीनव्दारे दिनांक 5 मे, 2021 रोजीच्या संध्याकाळपासुन फिर्यादी यांच्या आईला ऑक्सिजन पुरवठा चालु केला. आईस ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थीत चालू असल्याने आईच्या तब्येतीत सुधारणा होवु लागली होती. परंतु दिनांक 06 मे, 2021 रोजीच्या दुपारी 4.30 वाजेनंतर सदरचे मशीन बंद पडले. फिर्यादी यांनी रूपेश वरखडे याच्याशी संपर्क करून देखील त्याने ते मशीन सुरू करून दिले नाही. यामुळे फिर्यादी यांच्या आईचा 14 मे, 2021 मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आईच्या मृत्युस कारणीभूत ठरणार्‍या रूपेश मधुकर वरखडे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या