मुंबई | प्रतिनिधी Mumbai
राज्यातील शेतकरी मोठ्या अडचणींचा सामना करत असून परतीच्या पावसाने राज्यातील बहुतांश खरीपाची पीके अक्षरशः पाण्यात वाहून गेली आहेत. सोयाबीन, तूर, उडीद, मूग, मका ही पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. त्यातल्या त्यात काही जिल्ह्यांमध्ये थोडासा कापूस आणि भाताचे पीक शेतक-यांनी मोठ्या कष्टाने वाचवले आहे.
पण सरकारी खरेदी केंद्र सुरु नसल्यामुळे खासगी व्यापा-यांकडून लूट सुरु आहे. त्यामुळे सरकारने पुरेशी कापूस आणि धान खरेदी केंद्र सुरु करावीत आणि शेतक-यांची लूट थांबवावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांना पत्र लिहून केली आहे.
एकीकडे अस्मानी संकटापासून पीक वाचवणा-या शेतक-याला सरकारी अनास्थेला ही तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाच्या माऱ्यात जपलेले पीक आता पूर्ण नाही पण काही प्रमाणात हाती आले आहे. पण सरकारने अद्याप पुरेशा प्रमाणात कापूस आणि धान खरेदी केंद्र सुरु केली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापा-यांनाच त्यांचा शेतमाल विकावा लागतो आहे. त्यातच धान खरेदीसाठी घातलेल्या ऑनलाईन नोंदणीच्या अटीमुळे शेतक-यांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे, असे नाना पटोले यांनी यासंदर्भात सांगितले.
दुर्गम आदिवासी भागातील अनेक शेतकरी ऑनलाईन नोंदणी करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या मालाची अद्याप खरेदी झाली नाही. यामुळे सरकारने या ऑनलाईन नोंदणीची अट रद्द करून तत्काळ पुरेशी केंद्र सुरु करावीत आणि शेतक-यांचा कापूस आणि धान खरेदी करून अडचणींतील शेतक-यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.