अहिल्यानगर |प्रतिनिधी|Ahilyanagar
पुढील आठवड्यात सुरू होणार्या गणेशोत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी समाज कंटकांना हद्दपार केले जाणार आहे. या समाज कंटकांचे फ्लेक्स प्रमुख चौकात लावण्याचा धोरणात्मक निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात 400 समाज कंटकांवर हद्दपारीची कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शांतता समिती पदाधिकार्यांची गुरूवारी नगरला बैठक झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महापालिका उपायुक्त विजय मुंडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैभव कुलबर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, नगर प्रांताधिकारी सुधीर पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, गणेशोत्सवाची किर्ती सातासमुद्रापार गेलेली आहे. त्यामुळे उत्सवाचे पावित्र्य जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सव हा राज्याचा उत्सव म्हणून जाहीर केला आहे. या उत्सव काळात शासनाच्या योजनांची माहिती जनतेला मिळण्यासाठी विशेष मोहिम राबविली जाणार आहे. मुख्यमंत्री सहायता निधी, आत्मनिर्भर योजनेंतर्गत स्थानिक उत्पादनांना महत्व देणे आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती जनतेला दिली जाणार आहे. शासनाच्या या योजनांच्या प्रचार व प्रसाराच मंडळांनी पुढाकार घ्यावा. मोकाट जनावरांच्या बंदोबस्त करण्यासाठी विशेष मोहिम राबवावी.
मिरवणुकीच्या मार्गावरील खड्डे तातडीने दुरुस्त करावेत. विसर्जनस्थळी प्रकाश व्यवस्था, जीवरक्षक आणि वाहनतळाची सोय करावी. शहरातील पथदिवे नियमित सुरू राहतील, याची दक्षता घ्यावी.
नागरिकांना ध्वनीप्रदूषणाचा त्रास होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ठरवून दिलेल्या वेळेत आणि डेसिबल मर्यादेतच आवाज ठेवावा. उत्सवादरम्यान वाहतुकीची कोंडी होणार नाही, याची काळजी घेऊन वाहतूक सुरळीत राहील यासाठी कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांनी उपस्थित केलेल्या अडचणी आणि सूचनांवर संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश देत जिल्हा प्रशासनाकडून गणेश मंडळांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेतली जाईल, तसेच मंडळांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
महानगरपालिकेचे उपायुक्त मुंडे म्हणाले, शहरातील रस्त्यांची कामे सुरू आहेत. ज्या ठिकाणी कामे तातडीने होऊ शकत नाहीत, तिथे दुरुस्ती केली जात आहे. रस्त्यावरील मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल. शहराच्या स्वच्छतेवर भर दिला जात असून 30 घंटागाड्या आणि 10 ट्रॅक्टरच्या माध्यमातून कचरा गोळा केला जात आहे. उत्सवकाळात अधिक मनुष्यबळ व वाहने उपलब्ध करून स्वच्छता केली जाईल. शहरातील पथदिवे सुरू राहतील याची दक्षता घेतली जात आहे. मंडळांना परवानगीसाठी ‘एक खिडकी योजना’ सुरू करण्यात आली आहे. विसर्जनासाठी पारंपरिक ठिकाणांव्यतिरिक्त 17 ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडे तयार करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, पोलिस उपअधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक आदी व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे बैठकीला उपस्थित होते.
विशाल गणेश आरतीचे होणार नियमन
या बैठकीला विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या अडचणी व काही महत्त्वाच्या सूचना मांडल्या. शहराचे आराध्य दैवत माळीवाड्यातील श्री विशाल गणेश देवस्थानची मिरवणूक अग्रभागी असते. शहरातील भाविक मिरवणुकीच्या वेळेस रस्त्यात थांबून आरती करतात. त्यामुळे मिरवणुकीला वेळ लागतो, याकडे मयूर मैडसह अनेकांनी लक्ष वेधले. त्यावर देवस्थानचे विश्वस्थ आणि प्रशासनाने एकत्रित बैठक घेऊन मिरवणूक मार्गावरील आरतीचे नियमन करण्याचा ठरविले आहे.




