शिक्षणाचा नेमका अर्थ काय? शिक्षणशास्त्राची पुस्तके आणि वेगवेगळे विचारवंत वाचली, की अर्थ आणि व्याख्या भिन्न ऐकू येतात. त्या व्याख्यांचा केंद्रबिंदू मात्र एकच असतो .त्यांचा पाठलाग करीत प्रवास सुरू केला तर अंतिम प्रवास एकाच ठिकाणी होतो हे अंतिमता लक्षात येतेच. त्या प्रवासाचा केंद्रबिंदू माणूस निर्माण करणे हाच आहे. आता आपणास समाजात जे काही दिसते आहे तो समूह माणसांचा आहे का ?
आपल्याला आकार आणि अवयवात दडलेला प्राणातून एक सजीवत्व आले आहे. ते सजीवत्व अक्षराच्या साक्षरतेने समाजात वावरते.ती साक्षरता सोबत घेऊन जगणारा जो कोणी असतो तो खरच माणूस असतो ? पैशाच्या महापूरात चंगळवादाच्या महापाशात जो जगतो तो माणूस असतो? सत्तेच्या स्पर्धेकरीता एकमेकाला मागे टाकून नितीमूल्यांच्या शिवाय यशाच्या शिखरावर चढतो तो माणूस असतो ? संपत्तीच्या मोहाने सामान्याच्या समोर हात पसरवतो तो माणूस असतो ? कोणत्याही मूल्यांच्या शिवाय आणि विचारशुन्यतेने जगतो ते माणूस असतो? वर्तमानातील सर्व सुखाच्या गोष्टी प्राप्त केल्यावरही ज्याला स्वतःचा आवाज नसतो तो माणूस कसा असेल?
मनात भितीचे घर करून आणि स्वतःला मुक्ततेपेक्षा पिंज-यात जाणीवपूर्वक बंधिस्त करणारा शिक्षित असू शकत नाही आणि त्या दिशेने घेऊन जाणारे देखील शिक्षण असू शकणार नाही. कोणतेही शिक्षण हे मुक्ततेसाठी आणि निर्भय बनविणारे असते. त्या वाटा जे चालतात ते काळाच्या पटलावर आपला ठसा उमटवतात. त्यामुळे शिक्षण हे निर्भयता निर्माण करण्याच साधन असते हे लक्षात घ्यायला हवे.
वर्तमानात निर्भयता नाही. शिकलेली माणंस देखील आतून घाबरलेली असतात तेव्हा ते शिक्षित नाहीच. प्रत्येकाच्या समोर स्वतःला पंसत नसताना देखील काही तरी घडते आहे, पण त्यात स्पष्टता नाही आणि स्वतःचा आवाज देखील नाही. माणूस स्वतःला काय वाटते ते दाखवत नाही आणि दाखवावे वाटले तरी ते लपविण्यासाठी हुशारीचा उपयोग करतो. त्या हुशारीचे अनेकांना फार कौतूक वाटते. खरेतर अशी मुखावटा धारक माणंस कधीतरी आपल्या खर्या चेहर्याचे दर्शन घडवत असतात. अशा चेहर्यामागे लपलेली मुखवटयाची माणंस ही कितीही शिकली आणि पदव्याची कागदे हातात मिरवत बसली, तरी ती माणंस नाहीच हे लक्षात घ्यायला हवे. त्या हुशारीने आपण खरे कसे लपविले या आनंदात ते आनंद घेत असतात. अशा खोटया आनंदातच वेळ वाया घालविण्यात त्यांना धन्यता वाटते.
प्रत्येकाला एक सुरक्षितता हवी असते. आपल्याला कार्यालयात सुरक्षितता हवी आहे. समाजात सुरक्षितता हवी आहे. जाती, धर्माच्या व्यवहारात सुरक्षितता हवी आहे.त्या सुरक्षितेतच भिती दडली आहे. भिती घेऊन जगावे लागते. समोरच्याला काय वाटेल? या एकाच भितीने आपण आपली निर्भयता गमावून बसलो आहोत. ती निर्भयता गमावून बसल्यांने अनेकाचे फावते. महात्मा फुले यांनी मारेकर्यांना परतून लावले तो प्रसंग अनेकांना धडकी भरवतो ,पण त्या प्रसंगातून आपण केवळ फुल्यांच्या अंतकरणात असलेली निर्भयता या एकमेव कारणामुळे ते मारेकरांना पराभूत शकले होते.
महात्मा गांधी यांनी आपल्या समग्र आयुष्यात इंग्रज महासत्तेच्या विरोधात लढण्याची हिम्मत दाखवली.आयुष्यात अनेक प्रकरणात अवमान गिळण्याची हिम्मत त्यांच्यात साठवलेली दिसून येते.त्याचवेळी स्वातंत्र्याचा तिरंगा वरती चढत असतांना दिल्ली शेजारी दंगल उसळली होती. त्यावेळी गांधी नावाचा माणूस एकटाच दंगल शमविण्यात मग्न होता. एवढया मोठया इंग्रज साम्राज्याविरोधात हा एकटाच माणूस कसा लढत असेल ? एवढी मोठी शक्ति कोठून येत असेल , तर तो शिक्षणांचा परिणाम होता. गांधीजी जीवनभर निर्भयतेने जगले होते. त्यांना भिती नावाची कोणतीही गोष्ट त्यांच्या अवतीभोवती नव्हती. त्यामुळे निर्भयता त्यांना साधली होती. प्रत्येक कृतीमागे सत्याचा प्रवास होता. त्यामुळे माऊंटबेटन यांनी गांधी नावाच्या माणंसाचे वर्णन करतांना “ वन मॅन अर्मी ” असे केले आहे.
सत्याचा प्रवास हा नेहमी स्वार्थाच्या पलिकडे असतो.सत्याचा शोध याचा अर्थ निर्भयतेचा प्रवास आहे. सत्य पचविण्यासाठी मनालाही निर्भयता प्राप्त करावी लागते. त्यासाठी मनात भितीचे काहूर असेल तर आपल्याला त्या दिशेने प्रवास करता येणे शक्य नाही. अगदी शाळेत परीक्षेच्या काळात एखादा विद्यार्थी कॉपी करतो तेव्हा त्याला पकडले जाण्याची मनात भिती असते.
कॉपी करणे हा असत्याचा प्रवास असतो. त्या प्रवासात त्याच्या मनावर भितीचे दडपण असते त्यामुळे त्याच्या चेहर्यावर त्याचे प्रतिबिंब उमटतेच आणि त्याला पकडण्याची शक्यता अधिक असते.त्याचवेळी ज्ञानाची साधना करीत अभ्यास करणारा विद्यार्थी निर्भयपणे पेपर लिहित राहातो. स्वार्थ घेऊन आपण निर्भयतेचा प्रवास कसा करू शकतो हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे शिक्षणाने निर्भयता पेरल्याशिवाय समाज आपणाला अधिक समृध्द आणि उत्तम समाज निर्माण करता येणार नाही.
शिक्षण हे कधीच हेच कर असे सांगून त्या दिशेने जाण्यासाठीची आग्रही भूमिका ठेवत नाही. कोणत्याही गोष्टीची सक्ती आली की विचार हरवतात. हुकूमशाहीतून चांगले काही घडण्याची शक्यता नसते.स्वातंत्र्यात नेहमीच चांगले उगवते. आपण जेथे कार्यरत राहातो तेथील माणंसाना स्वातंत्र्य मिळाले तर त्या स्वातंत्र्याचा अर्थ अधिक जबाबदारी निभावणे असते. माणूस गुलामित अधिक सृजनशीलता गमावून बसतो हा इतिहास आहे.तर स्वातंत्र्यात अधिक सृजनात्मकता अधोरेखित होते. विद्यार्थ्याला चौकटीत काम करण्यापेक्षा स्वातंत्र्यात अधिक काम करणे आवडते.
मुददे देऊन लिहिणे अधिक कठिण जाते. केवळ विषय दिला आणि लिहिण्यास सांगितले तर विद्यार्थी अधिक चांगले लिहितात हा अनुभव आहे. ज्या घरात अधिक स्वातंत्र्याचे वातावरण असते तिथे मुले अधिक जबाबदारीने वागतात, तर जिथे अधिक दबाव, तणाव आणि निर्बंध असतात तेथील मुले अधिक बेजबाबदार असतात हा आपला सामाजिक अनुभव आहे. त्यामुळे शिक्षणातून स्वातंत्र्य उपभोगण्याची जबाबदारीचे भान येईल. त्यातून चिंतन, मनन घडवेल. त्यात स्वातंत्र्य असेल त्यामुळे प्रत्येकात दडलेल्या प्रज्ञेला स्वातंत्र्यात जागृततेचे दर्शन घडेल. ती जागृकता अंत्यत महत्वाची आहे. त्यामुळे मनातील भितीचे दडपणच नष्ट होईल. शिक्षणातून प्रज्ञा जागृती घडेल तर अनेक वर्तमानातील प्रश्न सुटतील. समाजातील हिंसा देखील थांबेल.
भितीत हिंसा दडलेली असते आणि निर्भयतेत अहिंसेचा समावेश असतो. चुकिचे काम करणारा माणूस नेहमीच हिंसक असतो. त्याची हिंसा चुकिच्या कामातून आलेल्या भितीचा परिणाम असतो. त्यामुळे शिक्षणाने निर्भयता पेरली. मनात येणार्या प्रश्नाना विचारण्याचे मुक्त स्वातंत्र्य दिले तर भिती नष्ट होईल. बालकांच्या स्वातंत्र्याने मोठ्यांच्या मुखवट्यांना धक्का बसेल हे मात्र खरे. आपला खरा चेहरा आपल्यालाच दिसेल. तो पाहाण्याची मोठ्यांची इच्छा नाही म्हणून लहानाना नेहमीच दाबून ठेवणारी व्यवस्था विकसित झाली आहे का ? असा प्रश्न पडतो.आपण कसे आहोत हे आरशा इतकेच सुंदर आणि स्पष्टतेने केवळ लहान मुलांचे स्वातंत्र्यच दाखवू शकेल.
भितीमुळे जीवनाचा आशय सापडत नाही. जगण्याचा हेतू लक्षात येत नाही. आपण केवळ धावत राहातो खोटया प्रतिष्ठा आणि लोभासाठी. शिकण्यांने सत्याचा पाठलाग करण्याची शक्ती निर्माण केली तर जीवनातील समस्या आपोआप सुटण्यास मदत होणार आहे. सत्याचा पाठलाग खर्या चेहर्याचे दर्शन घडवेल आणि निर्भयता सत्याचा पाठलाग करायला भाग पाडेल. त्या प्रवासाने समाज एका उंचीवर पोहचेल , त्या उंचीत राष्ट्राची उंची सामावलेली आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे.त्या उंचीने अनितीने महासत्तेची हाव राहाणार नाही. त्यातून शस्त्राची स्पर्धा संपुष्टात येईल आणि मग आपल्याला ज्ञानेश्वराच्या भाषेतील पसायदान मागण्याइतकी मनाची उंची आपोआप प्राप्त होईल. जग शांतीच्या मागे लागेल आणि माणूस शांतीचा दूत बनेल. शिक्षणातूनच शांतीचा मार्ग जातो असे म्हटले जाते, त्याचे कारण तेच आहे.चला तर प्रगत समाज अशाच शिक्षणाच्या शोधात आहे. त्यासाठी शाळा, शिक्षक आणि समाजांने आपली जबाबदारी निभावायला हवी. मनात दडलेली भिती हरवून निर्भयता निर्माण करायला हवी.
_संदीप वाकचौरे
(लेखक शिक्षणतज्ज्ञ तथा अभ्यासक आहेत.)