श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
भीमा नदीच्या पात्रात होत असलेल्या अनधिकृत वाळू उपश्यावर महसूल विभागाने कारवाई न केल्याने अजनुज आणि पेडगाव हद्दीत वाळूच्या उपश्यावरून गटागटात मोठा संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. महसूल प्रशासन जबाबदारी असून कारवाई करत नाही तर पोलीस प्रशासन देखील कारवाई करण्यास पुढे येत नाही. यातून भविष्यात मोठे टोळीयुद्ध होण्याची शक्यता गावकरी व्यक्त करत आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील घोड आणि भीमा पात्रासह छोट्या मोठ्या ओढ्या नाल्यात होणारी वाळूतस्करी अधून मधून डोके वर काढत आहे.
याबाबत दैनिक सार्वमतमध्ये भीमा नदीच्या पात्रात झालेल्या आणि होत असलेल्या अनधिकृत वाळूच्या उपश्याची बातमी प्रसिद्ध झाल्यावर या परिसरातील नागरिकांनी अवैध वाळूच्या उपश्यापासून होणार्या त्रासाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नदिपासून डांबरी पर्यंत रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून शेती कामाला जाता येत नाही. वाळूच्या या ट्रकच्या त्रासाबाबत तक्रार केली तरी कारवाई होत नाही. दुसरीकडे केलेले डांबरी रस्त्यावर अवजड वाहतुकमुळे पुन्हा खड्डे पडत आहेत. त्यावर वाहने चालवणे अवघड झाले आहे. गावकरी तक्रार करत असले तरी वाळू तस्कर यांना कोण तक्रार करत आहे. याची माहिती मिळत असल्याने तक्रार करावी की न करावी असा प्रश्न सामान्य जनता विचारत आहे.
घोड, भीमा, सीना नदींसह छोट्या मोठ्या नदी नाल्यांत मागील काही दिवसांपासून बंद असलेला अवैध वाळूचा उपसा पुन्हा जोरात सुरू झाला आहे. तहसीलदार यांचे अवैध गौणखनिज उपसा रोखणारे पथक आता कुठेही दिसत नाही. यामुळे वाळूची यंत्रणा पुन्हा जोम धरत आहे. यातून गटागटात मोठा संघर्ष होण्याची चिन्ह आहेत.नदीच्या मळई कुणाला वाळू काढायला द्यायची यावर सुद्धा शेतकर्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
संघर्षास जाबबदार कोण ?
पेडगाव व अजनुज परिसरात अवैध वाळूवरून गटागटात संघर्ष पेटला आहे. यात महसूल विभागही कारवाई करत नाही. याच्या परिणामी टोळी युद्ध भडकून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यास जाबबदार कोण? असा सवाल येथील नागरिक उपस्थित करत आहेत.