मालेगाव । प्रतिनिधी Malegaon
येथील पोलीस प्रशासनाने बेशिस्त वाहन चालकाविरोधात कारवाईचा बडगा उगारला असून शहरात विविध ठिकाणी वाहनचालकांच्या कागदपत्रांची तसेच वाहनाच्या वैधतेची तपासणी केली जात आहे. गेल्या वर्षभरात येथील वाहतूक पोलिसांनी १५ हजार वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करत तब्बल १ कोटीचा दंड वसुल केला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
. शहरात ट्रिपल सीट, विना हेल्मेट, आकर्षक नंबर, मोठे सायलन्सर, काळ्या काचा, वाहन चालविण्याचा परवाना नसतांनाही वाहन चालविणारे अल्पवयीन मुले, बाहेरच्या जिल्ह्यातील रिक्षाचालक यांच्यावर कारवाई करत जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत १४ हजार ४०६ वाहनावर कारवाई केली. या कारवाईत १ कोटी ३१ लाख ६२ हजार ३५० दंड वसुल केला. त्यात ९१५ वाहन चालकांनी प्रत्यक्ष ७ लाख ६१ हजार २०० रूपये दंडाची रक्कम भरली. शासनाने पोलिसांना ई पॉश मशिन दिल्याने या मशिनव्दारेही मोठ्या प्रमाणात दंडाची रक्कम भरली गेली आहे.
शहरात सध्या वाहन तपासणी मोहिम सुरू आहे. पालकांनी आपल्या १८ वर्षाखालील मुलांना वाहने चालविण्यास देवू नये, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. शहरातील खोकानाका, जाफर नगर, मोसमपुल, रावळगाव नाका, सटाणानाका, एकात्मता चौक, मनमाड चौफुली, नवीन बसस्थानक या भागात ही कारवाई सुरू आहे. नाशिक येथील वाहतूक पोलीस शाखेचे दहा पोलीस कर्मचारी गेल्या आठवड्यापासून वाहनांची तपासणी करीत आहेत.